फौज आणि मौज

12 07 2009

फौज:-

****

ढगांची नभी वाढती फौज आहे
इथे आठवांची मनी फौज आहे

मला एकटयानेच जिंकून गेला
वृथा आणली केवढी फौज आहे

नवी शांतिदूतासवे लष्करेही
अहिंसा, म्हणे कालची फौज आहे !

मनासारखे लाभले दान थोडे
उभी मागण्यांची नवी फौज आहे

तसा शूर आहे तिचा हा अबोला
सवे आसवांची छुपी फौज आहे !

**********************

मौज :-

*****

बहाण्या-उखाण्यांतली मौज आहे
तिला भेटणे वेगळी मौज आहे !

करा वादळाचीच निंदा कशाला
किनारी तरी ह्या कुठे मौज आहे ?

तुझा संग नाही नशीबी- नसू दे
तुझ्या फक्त ध्यासातही मौज आहे !

कुणा आवडे स्पष्ट बोलून घेणे

कुणा वाटते मौनही मौज आहे..

जरा आपले दु:ख वाटून घेऊ…
असे वाटणेही किती मौज आहे !

उन्हाच्या कपाळी सदाचा उन्हाळा
उन्हाळी सुटीची कधी मौज आहे ?
************************

आणि एक स्फुट द्विपदी…

तुला भेटणे वेगळी मौज आहे
मला रोखण्या केवढी फौज आहे !

पावसाळी

02 07 2009

मेघ काळे दाटलेले वेळ झाली पावसाळी
शुष्क ओठी पालवीचे गीत आले पावसाळी

कोरडे आयुष्य गेले ही कुठे तक्रार आहे ?
कैक होत्या आठवांनी चिंब रात्री पावसाळी !

दूरदेशी ऊनवारे, सोसताना-राबताना
ओढ लावीती घराची.. दोन डोळे पावसाळी

मूक दोघे – सोबतीला बोलका पाऊस होता
आज तो वर्षाव ना- कोठून नाते पावसाळी ?

काय हा पाऊस वेडा- शोधतो माझ्यासवे तो
बालकांची कागदी ती आरमारे पावसाळी !

लिहीन म्हणतो

16 06 2009

(एकाच ‘जमिनी’वर आधारित दोन रचना एकत्र देत आहे, कृपया हे ही पहावे:
http://www.manogat.com/node/16936
http://www.maayboli.com/node/8594)

***********************************

लिहीन म्हणतो तुझ्याच साठी सुरेल कविता
निदान मागे तुझिया ओठी उरेल कविता

मनातले मी जनात नाही कधी बोललो
गात राहिलो, मला वाटले- पुरेल कविता

तिला न जमलेच एकदाही वळून बघणे
कधी न कळले तिला अशाने झुरेल कविता

तिला न कसलीच बंधने, ती स्वैर विहरते
कुणास ठावे कुणास कोठे स्फुरेल कविता

गुलाब भिरकावुनी कशाला देसी सखये
मलाच दे तो- उगाच माझी चुरेल कविता !

***************************

लिहीन म्हणतो तुझ्याचसाठी सुरेल कविता
मराठमोळी तुझ्यासारखी तजेल कविता

जरा किलकिले करा मनाचे कवाड रसिका
झुळूक थोडी तिला लागुद्या, फुलेल कविता

कठीण इतके असते का हो हसून बघणे ?
कुणी समजवा तिला- अजूनी जगेल कविता

कठोर वचने तिच्यासमोरी नकोस बोलू
सराव मजसारखा तिला ना- रुसेल कविता

नभात दिसता टपोर तारा वेडावुन मी
पहात बसतो-कधी मलाही दिसेल कविता !

*****************************

वाट पहाणे

20 04 2009

आयुष्याच्या हुंकाराला प्रथम भेटते वाट पहाणे
अव्याहत साखळीतल्या दो श्वासांमधले वाट पहाणे

वाट पहाणे चुकले कोणा-जुनी कारणे, नवे बहाणे
एकसारखे,वेगवेगळे- ज्याचे त्याचे वाट पहाणे

जागेपणिचे भान घेउनी रोज त्याच स्वप्नात रहाणे
कुणी आपली वाट पहावी, ह्याची सुद्धा वाट पहाणे

वाट पाहण्याचे हे ओझे पाठीवरती रोज वहाणे
संपावे हे वाट पहाणे, कुठवर ह्याची वाट पहाणे ?

पुरे थांबणे-कधी वाटले,आता तरि होऊत शहाणे
सारे सरले,काही नुरले- आता कसले वाट पहाणे?

आता कळते, नाही सरले -कधी संपते वाट पहाणे !
नित्याचे हे येणे जाणे -पुन्हा भेटुया, वाट पहाणे…

रामजन्म

01 04 2009

(ॠणनिर्देशः मूळ चाल आणि प्रेरणा  ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’  हे सुमधुर गीत.

वृत्तः गाल गाल गाल गाल गाल गालगा )

रामजन्म आज साजरा घरोघरी
रामनाम आज घेउया परोपरी
रामजन्म आज घरी…..                 ॥ धृ ॥
ते चरित्र हो पवित्र रोज आठवू
शौर्य तेज रूप मानसात साठवू
रामराज्य हो मनामनात जागवू
रामनाम गात धन्य होत वैखरी     ॥ १ ॥
दोन अक्षरांत मोक्षधाम लाभते
गोड नाव भाविकास वेड लावते
संकटात साधकास मार्ग दावते
रामनाम रामबाण हो खरोखरी       ॥ २ ॥

एकेक दिवस

22 02 2009

एकेक दिवस असा असतो
मी सार्‍यांना नकोसा भासतो
मनातल्या वाचाळ निंदकावर
मग सहजच विश्वास बसतो

एखादा दिवसच खास असतो
पहाटेच डोळा भिडवून हसतो
चालीत लकब,बोलीत चमक
प्रत्येक क्षण ‘हमखास’ असतो

कधी तो मला सामिल असतो
तरी तो कधीच गाफिल नसतो
अंधाराचा फायदा घेत, अलगद
रोज हातोहात निसटत असतो

दिवस रोज येत-जात असतो
तरी प्रत्येकदा नवीन असतो
रोज नव्यानेच भेटून मला
थोडा जुनाच करुन जात असतो

दिवस म्हणे कधी असाही उजाडतो
आवाज न करत निरोपाचा रडतो
कधी समजून, कधी नकळत
जन्माचा सहवास क्षणात सोडतो..

देवाण-घेवाण

22 02 2009

तो सार्‍यांना काही न काही देत असतो
आपण काही मिळालं नाही, म्हणत रडत असतो
मिळालेलं वापरत नसतो,
न मिळालेलं विसरत नसतो
पुरेसं मिळालं नाही म्हणत कुढत बसतो
दुसर्‍याला जास्त मिळालं की चडफडत असतो
‘मला पुरे’ म्हणणारा इथे एखादाच दिसतो
देताना तो आपला, घेताना कुणीच नसतो

तो वरुन सारं बघत मजेत हसतो…
कधी तो घेतलेलं परत देत असतो,
कधी परत घेण्यासाठीच देत असतो

आपण माणसंही आपसात देत-घेत असतो
मिळालेलं गृहित, दिल्याचा मात्र हिशेब असतो
देवाण-घेवाण संपेतो आपण इथेच रुळतो,
कार्यभाग उरकला, की गाशा गुंडाळतो

आपल्याला परत घ्यायला तो बसलेलाच असतो,
त्याचा व्यवहार अव्याहत चाललेलाच असतो…

पुढचा निर्णय

01 02 2009

परवाच मला भेटला- खजिल, खांदे झुकलेला
माझाच एक ताजा निर्णय- साफ चुकलेला
एकटेपणाची भावना दुखवत होती त्याला-

मी म्हटलं, तू नाहीस माझा पहिला-
नक्कीच नसशील शेवटचाही,
असा नेम हुकलेला!

घेऊन गेलो त्याला
भूतकाळाच्या तळघरात,
चुकल्यामाकल्यांची  वरात
तिथे पाहून तो दचकला-
अहोरात्र पेटलेल्या अहंकाराच्या धुनीभोवती
दबक्या आवाजात बोलत बसलेले,
त्याला दिसले बरेच अंदाज-आडाखे
त्याच्यासारखेच फसलेले

उजळ माथ्यांचेही होते थोडे
चुकून अचूक ठरलेले,
आणि वेळ टळल्यावर घेतलेले
काही सावधपणे बेतलेले

माझ्याकडे शेवटचं एकदा बघून,
तो त्यांच्यात मिसळला,
बघता-बघता इतिहासजमा झाला..

हात झटकून मीही निघालो,
थांबायला वेळ कुठे होता?
माझी वाट पाहत खोळंबलेला
पुढचा निर्णय घ्यायचा होता !

गझलेस मनोभावे

18 01 2009

कोणा कसे कळावे की काय साहिले मी
गझलेस मनोभावे आळवुन पाहिले मी ॥ धृ ॥

ते ‘छंद’ पोसताना निघते असे दिवाळे
‘गागाल गाल’  गाता की गालगुंड झाले
तोंडास फेस माझ्या कोणास ना कळाले
वृतात मी लिहीले ह्याचेच वृत्त झाले !

वेडात काय गोडी चाखून पाहिले मी ॥१॥

वस्तीत रदीफांच्या काफिले काफियांचे
मिसरे, अलामतीचे ते दाखले तयांचे
मक्त्यास हा उतारा-  हे स्थान ‘मातल्यां’चे
जमिनी मशागतीचे कुळकायदे युगांचे !

हे काम जोखमीचे, परि शांत साहिले मी ॥२॥

नको आता

01 12 2008

वाट इतकी पाहणे- नको आता
स्वप्नातही जागणे- नको आता

बासरी ती चालली मथूरेला
गोकुळी ह्या थांबणे नको आता

पानगळ ही पाहणे साहवेना
रोप दारी लावणे नको आता

खरे बोले आरसा नको तेव्हा
तोंड त्याचे पाहणे नको आता

मौन माझे सोडून पाहिले अन
काय झाले-सांगणे नको आता

काळजाचा तुकडा कसा खुडावा ?
लेक पोटी मागणे नको आता

*************

( बीज तेच, जमीन वेगळी.. )

खोटेच हासत राहणे नको आता
ओझे फुकाचे वाहणे नको आता

आयुष्य सारे नाडले मला त्यांनी
वेडेच द्या- मज शाहणे नको आता

आहे सुखी मी दु:खात माखलेला
त्या आसवांनी नाहणे नको आता

रागावणे लटकेच- जीवघेणे ते
प्रेमात गाफिल राहणे नको आता

सारेच ह्या भवसागरी बुडालेले-
पाण्यात कोणा पाहणे नको आता