Archive for the ‘मराठी कविता’ Category

संवादाकरता 

27 07 2023

संवादाकरता 

आम्ही दोघं शोधतोय 

एक निरुपद्रवी विषय ,

जसा एक स्तब्ध जलाशय …

त्याच्या ‘ कलहमुक्त ‘ घोषित केलेल्या 

आपापल्या काठांवर बसून

आम्ही टाकत राहूत 

वापरुन गुळगुळीत झालेल्या 

निरर्थक प्रश्नोत्तरांंचे खडे…

अश्या हुशारीने , की त्यांनी निर्माण केलेल्या तरंगांमुळे

भास होत राहील, प्रवाहीपणाचा !

खरं तर आत कुठेतरी वाटत रहातंच,

की बोलावं झडझडून- 

सारा धीर एकवटून

एकदा भांडावं कडकडून …

वादाकरता –

निदान , त्यात लपलेल्या 

संवादाकरता …

छंद आनंदाचा

27 07 2023

देखिला तो कंद आनंदाचा 

लाभला मज छंद आनंदाचा 

डोळियांच्या ओंजळीने सारा 

प्राशिला मकरंद आनंदाचा 

बासरीची साद रानी जाता 

हेलकावा मंद आनंदाचा 

हासला तो खेळिया जाताना…

भासला आनंद आनंदाचा 

सांडिली भवबंधने जीवाने 

सोहळा स्वच्छंद आनंदाचा !

सुरुवात नव्या दिवसाची

06 11 2010

( कृपया हेही पाहावे :  http://www.manogat.com/diwali/2010/node/5.html )

 

अवचित नौका ऊर्मीची जाणीवकिनारी यावी
हरखून उठावी प्रतिभा, स्वागता समोरी जावी

बघताच तिला प्रतिमांची मोहक तारांबळ व्हावी
शब्दांनी फेर धरावा, छंदाची वसने ल्यावी

लय लोभस एक सुचावी, गोडशी सुरावट गावी
प्रासांचे पैंजण पायी, रचनेने गिरकी घ्यावी

इवल्या प्राजक्तकळ्या ती, ओंजळीत घेउन यावी
वेळावुन मान जराशी, आश्वासक मंद हसावी

सुरुवात नव्या दिवसाची एकदा अशीही व्हावी
हलकेच मला जागवण्या सुंदरशी कविता यावी !

पिंक स्लिप

26 04 2010

कृपया हे ही पहावे :

http://www.manogat.com/node/19593

***************************************

भिंतीवर माझी  ‘ चीफ, एचआरडी ‘ ची पाटी आहे
नावासोबत विदेशी पदव्यांची दाटी आहे
समोर बसलेला, माझ्या दुप्पट वयाचा
इथला सर्वात जुना कर्मचारी विचारतोय,
‘ हे सकाळीच बोलावणं कशासाठी आहे? ‘
….
तो बंद लिफाफा मी मूकपणे त्याला देतो–
कुठल्याच गुलाबी भावनांशी नातं नसणारी
पिंक स्लिप आहे त्यात, जुनी नाती पुसणारी..

मी आवंढा गिळतो,
आणि बरेचसे अवघडलेले शब्दही.
एवढं शिकलो, पण एवढंच शिकलो नाही-
शांतपणे कसं सांगायचं कुणाला,
‘उद्यापासून तुम्ही यायची गरज नाही’ ?

दोन धीराचे शब्द मला सुचायच्या आतच-
त्या दोन ओळी वाचून
तो सावकाश उठतो,
माझी अवस्था पाहून अचानक मोकळं हसतो.
आणि उभं रहायचंही विसरुन गेलेल्या मला
खांद्यावर हलकं थोपटून, निघूनही जातो….

आता केबिनमध्ये माझ्या सोबतीला
एक नवंच कोडं मुक्कामाला आलंय-
आज इथे
नक्की कुणी कुणाला मुक्त केलंय ?

लवाद

15 11 2009

(कृपया हेही  पहावे :
http://www.manogat.com/node/18283 )

बाप-लेक आज पुन्हा कडाक्यानं भांडलेत-
टोकदार अपशब्द घरभर सांडलेत..
मी सारं ऐकतेय, पाहतेय
त्याच्या डोळ्यांतले अश्रू – धुमसणारे
आणि ह्यांचे अबोल हुंदके
फक्त मलाच ऐकू येणारे…
..
दोन वादळांमधल्या अस्वस्थ शांततेत
जीव मुठीत घेऊन वावरतेय,
त्या क्षणाला टाळत-
जेव्हा मला बनावं लागेल
त्या दोघांतला लवाद ,
ज्याला नसते
स्वतःची कुठलीच दाद- फिर्याद
..
त्या दोघांची वकील, साक्षीदार
माफीचाही –
मीच असणार आहे
कुणी जिंको वा हरो, शेवटी
मीच हरणार आहे….

लग्नाची गोष्ट

21 10 2009

( कृपया हे ही पहावे :  http://www.manogat.com/node/18095 )

त्याच्या एकविसाव्या वाढदिवसाआधी एकदा

विशीची वेस पार केलेलं आमचं लग्न आलं समोर

आणि म्हणालं,  ‘माझं आता मतदानाचं वय झालं,

निवडणूका कधी घेताय बोला !

माझा येता वाढदिवस करु मतदानाचा दिवस.

मी एकटा मतदार, तुम्ही दोघे उमेदवार

फोडा नारळ आजच, सुरु करा प्रचार !’

मी सपत्नीक चपापलो, गोरामोरा होउन म्हणालो,

” आमचं आहे सहमतीचं राजकारण

मग निवडणूकीला रे काय कारण ?”

लग्न म्हणालं ‘ ते तुमच्या मतदारालाच ठरवू द्या,

बर्‍या बोलाने मला माझा हक्क बजावू द्या !…’
…….

प्रक्रिया सुरु झाली,  सभांना भरती आली

दोषारोप,घोषणा, आश्वासनं आणि वल्गना

मतदानाची गुप्तता लग्नाला ठाऊक होती

परिस्थिती त्यामुळेच जरा नाजूक होती…

लग्नाच्या वाढदिवसाला येणार बरेच प्रेक्षक,

शुभचिंतक आणि काही…राजकीय निरीक्षक

समारंभपूर्वक शोभा होण्याची दोघांना चिंता होती,

आचारसंहितेमुळे घरी निवडणूकपूर्व शांतता होती….

…….

प्रचार संपल्यावर आमची गुप्त सभा झाली

सल्लामसलतीतून एक योजना पुढे आली

अंतर्गत सुरक्षा आणि गृहशांतिच्या नावाखाली

आम्ही घरातच आणिबाणी जाहीर केली —

— आणि सर्वप्रथम निवडणूकच रद्द झाली….
…….

बिचार्‍या आमच्या लग्नाचा

अंदाज जरा चुकला

आमच्याएवढा प्रजासत्ताकाचा

त्याला अभ्यास कुठला !

दोन अवस्था

17 10 2009

( कृपया हे ही पहावे :  http://www.manogat.com/diwali/2009/node/14.html )
किती रुसावे किती फुगावे – कधी लाजरे रूप दिसावे
वाट पाहतो मला पाहुनी एकदातरी तिने हसावे !

झंकारुन ते तिने हसावे, उरात भलते-सलते व्हावे
कधी आठवुन तिला मनाने पिसासारखे हलके व्हावे

असे असावे तसे नसावे चौकटीत ते कसे बसावे
वेड लावते दोन जिवांना – खरेच का हे प्रेम असावे ?

*****************************************
इथे दुखावे तिथे खुपावे असे काहिसे रोजच व्हावे
माडीवरती स्वस्थ पडावे – जग बाजूने वाहत जावे

हाती थोडेफार मिळावे, बरेचसे अधुरेच रहावे
कधी आठवुन जुने-पुराणे विनाकारणे हळवे व्हावे

काय साधले, किती हरपले – चौकशीत ह्या कुणी रमावे
वेध लागले पैलतिराचे… खरेच की, वार्धक्य असावे !

वाट पहाणे

20 04 2009

आयुष्याच्या हुंकाराला प्रथम भेटते वाट पहाणे
अव्याहत साखळीतल्या दो श्वासांमधले वाट पहाणे

वाट पहाणे चुकले कोणा-जुनी कारणे, नवे बहाणे
एकसारखे,वेगवेगळे- ज्याचे त्याचे वाट पहाणे

जागेपणिचे भान घेउनी रोज त्याच स्वप्नात रहाणे
कुणी आपली वाट पहावी, ह्याची सुद्धा वाट पहाणे

वाट पाहण्याचे हे ओझे पाठीवरती रोज वहाणे
संपावे हे वाट पहाणे, कुठवर ह्याची वाट पहाणे ?

पुरे थांबणे-कधी वाटले,आता तरि होऊत शहाणे
सारे सरले,काही नुरले- आता कसले वाट पहाणे?

आता कळते, नाही सरले -कधी संपते वाट पहाणे !
नित्याचे हे येणे जाणे -पुन्हा भेटुया, वाट पहाणे…

रामजन्म

01 04 2009

(ॠणनिर्देशः मूळ चाल आणि प्रेरणा  ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’  हे सुमधुर गीत.

वृत्तः गाल गाल गाल गाल गाल गालगा )

रामजन्म आज साजरा घरोघरी
रामनाम आज घेउया परोपरी
रामजन्म आज घरी…..                 ॥ धृ ॥
ते चरित्र हो पवित्र रोज आठवू
शौर्य तेज रूप मानसात साठवू
रामराज्य हो मनामनात जागवू
रामनाम गात धन्य होत वैखरी     ॥ १ ॥
दोन अक्षरांत मोक्षधाम लाभते
गोड नाव भाविकास वेड लावते
संकटात साधकास मार्ग दावते
रामनाम रामबाण हो खरोखरी       ॥ २ ॥

एकेक दिवस

22 02 2009

एकेक दिवस असा असतो
मी सार्‍यांना नकोसा भासतो
मनातल्या वाचाळ निंदकावर
मग सहजच विश्वास बसतो

एखादा दिवसच खास असतो
पहाटेच डोळा भिडवून हसतो
चालीत लकब,बोलीत चमक
प्रत्येक क्षण ‘हमखास’ असतो

कधी तो मला सामिल असतो
तरी तो कधीच गाफिल नसतो
अंधाराचा फायदा घेत, अलगद
रोज हातोहात निसटत असतो

दिवस रोज येत-जात असतो
तरी प्रत्येकदा नवीन असतो
रोज नव्यानेच भेटून मला
थोडा जुनाच करुन जात असतो

दिवस म्हणे कधी असाही उजाडतो
आवाज न करत निरोपाचा रडतो
कधी समजून, कधी नकळत
जन्माचा सहवास क्षणात सोडतो..