रविवार

14 10 2007

तो सहा दिवस उभा असतो, इतरांच्या मागे
शांतपणे, आपल्या पाळीची वाट पहात.

शनिवार दुपारपासून तो दिसू लागतो,
काही भाग्यवंतांना शुक्रवारपासूनच!

आठवड्याची अव्याहत कदमताल आपण सहन करतो,
त्याच्यावर ठामपणे नजर ठेवूनच…..

दररोज करावीशी वाटून एकदाही होऊ न शकलेली,
आणि नकोशी झालेली, कंटाळवाणी पण आवश्यक
अशी सगळी कामं त्याच्या हवाल्यावर सोडून,
सारया अपूर्ण आशा-आकांक्षांचं बोचकं
त्याच्या खुंटीला टांगून…..

करकचून मुसक्या बांधलेल्या आयुष्याला
काही काळापुरतं तरी सैल सोडण्याचं स्वप्न पहात
आपण त्याच्या वाटेकडे डोळे लावून रहातो.

सातां दिवसांपलिकडच्या त्या रविवाराला मात्र माहित असतं,
आठवड्यातनं एकदाच येतो, म्हणूनच आपलं महत्त्व असतं !

सरकार

14 10 2007

सरकार आपलं असं असावं –  जागरूक, कर्तव्यपरायण असावं
माझ्या वाट्याच्या जबाबदारयांशी मात्र, त्याला काही कर्तव्य नसावं

सरकार आपलं – जनहितरक्षक, लोकप्रतिपालक असावं
माझ्या अवसानघातकीपणाकडे मात्र, त्याचं पुरेसं लक्ष नसावं

सरकार आपलं – कनवाळू, मानवतावादी असावं
माझ्या अमानुष वर्तनाकडे मात्र, त्याचं सोईस्कर दुर्लक्ष असावं

सरकार आपलं – सर्वधर्मसमावेशक, सहिष्णु असावं
माझ्या उन्मत्त उतावीळपणाचंही, त्याला तितकंच कौतुक असावं

सरकार आपलं – नि:पक्षपाती, नीतिमान असावं
माझ्या नैतिक दिवाळखोरीला मात्र, त्याचं आव्हान नसावं

सरकार आपलं – प्रजासत्ताक, लोकतंत्र असावं
माझ्या स्वायत्त मनमानीचंही, इथे समर्थन असावं

सरकार आपलं – उदारमतवादी, विश्वबंधुत्त्वाचं असावं
माझ्या कूपमंडूक वृत्तीलाही, इथे मानाचं स्थान असावं

सरकार आपलं – वैभवशाली, सुखसंपन्न असावं
माझ्या कद्रूपणाचं मात्र, त्याला कधी वावडं नसावं

सरकार आपलं – संस्कृती, इतिहास जपणारं असावं
माझ्या बिनबुडाच्या परंपरावादाचं,  त्याला तितकंच अप्रूप असावं.

सरकार आपलं कसं  पुरोगामी, गतिमान असावं,
निष्क्रिय ओझं बनून रहायचं मला, व्यक्तिगत स्वातंत्र्य असावं !

बायको

13 10 2007

अशी आपली बायको असावी – हजार जणींत उठून दिसावी
थोडीसुद्धा तिला मात्र, त्याची मिजास नसावी

अशी आपली बायको – भक्कम पगाराची,कायम नोकरीची असावी
मी म्हणेन तेव्हा मात्र, ती मला घरीच दिसावी

अशी आपली बायको – चतुर, शहाणी,अभिमानी असावी
नम्रपणे माझ्यापुढे मात्र, मान तिची खाली असावी

अशी आपली बायको – सभेत धीट, कामाला वाघ असावी
माझ्यासमोर घरीदारी मात्र, ती गरीब गाय असावी

अशी आपली बायको – बोले तैसी चालणारी असावी
माझ्या जुन्या वचनांची मात्र, तिला कधी आठवण नसावी

अशी आपली बायको – प्रसन्न, सदा हसतमुख असावी
माझ्या आक्रस्ताळीपणावर मात्र, तिच्या भाळी आठी नसावी

अशी आपली बायको – शांत गंभीर, पोक्त असावी
माझ्या बालिशपणाविषयी मात्र, तिची काही प्रतिक्रिया नसावी

अशी आपली बायको – व्यवहारी, काटकसरी असावी
माझ्या उधळपट्टीवर मात्र, तिची कधी टीका नसावी

अशी आपली बायको – एक आदर्श गृहिणी असावी
माझ्या ढिसाळपणाबद्दल मात्र, तिची काही तक्रार नसावी

अशी आपली बायको  – सुसंस्कृत माता असावी
माझ्या बेबंद वागण्याची मात्र, मुलाबाळांवर सावली नसावी

अशी आपली बायको असावी – माझ्यापलिकडे तिची दृष्टी नसावी
मी खिडकीबाहेर बघण्याला मात्र, तिची कधी हरकत नसावी !

आभाळ वेडे

10 10 2007

प्रतिभायोगे एकदाची, घटिका भरली निर्माणाची
यथावकाश ओघवली, कविता इवलीशी नवसाची.

हळूहळू दिसामासी, वाढू लागे कविता तैसी ,आनंद बहु कविमानसी
चिंता परी लगोलग त्यासी, तिच्या पुढल्या प्रवासाची.

कधी कविचे बोट धरुनी, कधी त्याच्या कडेवरुनी
कविसंमेलनी, काव्यवाचनी, कविसंगे कविताही जाऊ लागली.

बहरून सर्वांगी झाली थोर, कविमना लागे घोर
हिला अनुरूप तालेवार, मिळे कोण असा रसिकवर ?

धीर करुनी मग कविराव, शोधे फिरे गावोगाव
मुद्रेवरी वधुपित्याचे भाव, त्याच्या काव्यवाचना वाव
परि कुठे मिळेना,
दामटावे घोडे पुढे आपुले हे धाडस त्याला होईना !

सोन्यावाणी लेक लाडकी, तिला मिळेल का कुणी रत्नपारखी….
मिळेल का स्नेही हितचिंतक, काव्यप्रेमी अन् दर्दी वाचक?

परि कविला पुरते ठाऊक,
येते जेथुन काव्य तेथुनच, येती ते गुणग्राहक रसिक….
नशिबावरि ठेवून हवाला, प्रकाशना धाडिले तियेला
काळ बहु लोटियला पण, देईना कुणी होकाराला.

कालगतीने एके दिवशी, गेला तो कवि निजधामासी
पंचत्त्वी तो  विलीन होई, परि चित्त तयाचे मागे राही,
नभातुनी तो पाहत राही.

नित्यनेमे मग कविता ती, बसे येऊनी ओढ्यावरती
येई तिथे मग एके मिती, स्वार शुभ्र घोड्यावरती
तृषार्त शोधक  वाचक एक, सौंदर्याचा नित्य उपासक
कवितेवरी ध्यान आपसुक, पडे दृष्टी अन् होई भावुक.

म्हणे,’ कोण गे तू रुपवती, सुलक्षणी ऐश्वर्यवती
कोण कुल अन् कवण पिता तव, वसशील का तू माझे चित्ती ?’

खिन्न हासुनी कविता मग बोले, “वाट पाहुनी बाबा गेले,
रसिकराज उशिराने आले,
पण कुणावरही मी नाही रुसले,
आम्हा कवितांचे हे नशिबच असले….
बहु करवलित तुम्ही प्रतीक्षा,  सफल आज मम सत्त्वपरीक्षा!”

रसिकहृदयी मग ती डोले,
हर्ष मानसी परि नयन ओले
नभाकडे पाहुन ती बोले,
“बघा, ते आले !”
आभाळ वेडे –अपुल्याशीच मग
कृतार्थपणे, गदगदून हसले !

भोंडला

08 10 2007

शनिवारी, संध्याकाळ झाली तशी ग्रंथालयाची दालनं बंद होऊ लागली.
दिवे मालवत येत असताना, दर्शनी भागात असलेल्या काव्यविभागातल्या 
काव्यप्रकार आणि आकाराप्रमाणे कपाटांच्या खान्यांत हारीने मांडून ठेवलेल्या

पुस्तकांवर शेवटची नजर फिरवून दरवाज्याला  उद्याच्या सुटीकरता कुलुप

लावायला ग्रंथपाल मुख्यद्वाराकडे निघाला.
त्याची पाठ वळते तोच हाळी आली, ” चला गं , तो गेला !”,  आणि सुरुवात

झाली, काव्यविभागाच्या भोंडल्याला. भराभरा उघडलेल्या खिडक्यांतून बरसणारया

चंद्रप्रकाशात रंगलेल्या या सोहळ्याच्या निमंत्रितांबद्दल हा पेज थ्री वृत्तांत……….
*************************************************************

 भोंडला

******

ग्रंथालयाच्या काव्यविभागातल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होत होती……

”  चला चला गं , भोंडल्याला ! ”
साद आली , आणि एकच गिल्ला झाला.
जिन्यांमधून धडधडा उतरण्याचा आवाज येऊ लागला.

कुणालाही काहीबाही बोलणारी वात्रटिका,
होती कार्यक्रमाची निमंत्रिका.
तिच्याबरोबर होती –चाकोरीबाहेरची
नवकविता, बंडखोर जीन्सच्या सवयीची, 
आणि किलकिल्या डोळ्यांची
एक पाहुणी हाइकू, अगदीच तोकड्या कपड्यांची.

स्वागतगीताने आरंभ करी, उच्चरवा नांदी सुलक्षणी
त्यांना बघून सभास्थानी,
जमू लागल्या भोंडलेकरणी.
 
एक बनून आली  एक लाजरं सुनीत, 
नुकतंच चौदावं सरलेली, चांगलीच बावरलेली
आश्वासक साथ तिला देण्या
दुसरी आली बनून उखाणा,
सवयीचं नाव घेऊन बरीचशी सावरलेली.
 
ओजस्वी फेट्याखाली शब्दसंभार लपवून
एक झाली होती आवेशपूर्ण पोवाडा,
दुसरी, अनुप्रास यमकांच्या शब्दाबाहेर नसलेली
सासुरवाशीण नवोढा
तिच्या समवेत एक पोक्त काव्यपुरंध्री— शालीन, काठपदराच्या साडीतली.

हिरव्यागार मोरपिशी पेहेरावातली सुस्वरुप एक निसर्गकविता,
आणि पिसागत तरंगणारी, भिरभिरत्या नजरेची ती प्रणयकविता.
एक घाईघाईत आलेली, थोडीशी विस्कटलेली शीघ्रकविता.

तडफदार कदमतालाचं लेणं मिरवित होती एक  समरगीता.
तिच्या बरोबर आली नाट्यपदांनी शृंगारलेली एक अक्षर संगीतिका.

डोळे मोडित ठुमकत एक लावणी आलेली ,
एका बेसावध क्षणी अभंगाला भुललेली.

कुणीतरी बळेच ओढून आणलेली एक विराणी, खिन्नवदना.
आणि सगळेच वचकून होते जिला, अशी एक विडंबना.

अर्ध्या दळणावरून उठून आलेली,
रुपेरी केसांची एक सात्त्विक ओवी,
सोबतीला, काठी टेकीत उतरलेली
जख्ख म्हातारी आर्या– अभिजात, अनुभवी.

भरजरी शालूतलं, उच्चकुलोत्पन्न
अतिविशाल एक महाकाव्य प्रसन्न
अवजड गतवैभवखुणा सांभाळत,
उतरलं आपल्या युवा पिढीसोबत.

भावुक डोळ्यांची, जोडीला आली
एक चारोळी, परकर पोलक्यातली.
तिचं बोट धरून होती ,  इवलाली
बडबडगीता, झबलं-टोपड्यातली.

अशी जमवाजमव होइतो, चांगलीच रात्र झाली,
वेळ टळून गेली झोपेची, भूपाळी पेंगुळली.

शांत संयत अंगाई जागे ,
टक्क उघड्या डोळ्यांची
रोजचीच तिला सवय,
सगळ्यांना झोपवून मग निजायची!

नाच-गाणी संगीत वादन, त्या ठेक्यावर फेर धरून 
सारयाच दमल्या,  भोंडला रात्रभर जागवून .

यथावकाश, पूर्वरंग उधळत
दिनकराची प्रभातफेरी सुरु झाली,
तेव्हा कुठे राष्ट्रगीताने
कार्यक्रमाची सांगता झाली !

मी

08 10 2007

मी शोधतोय माझ्यातल्या नेहेमीच्या ‘मी’ला
माझ्या सवयीच्या,रोजच्या ‘मी’ला

हा कोण नवीनच मी
‘मी मी’ म्हणत पुढे येतोय?

असे आहेत अनेक मी माझ्यात.
प्रत्येकात आहेच मी थोडा थोडासा,
तरी या सर्वाना पचवून मी उरतोच बराचसा.

एक मी झालेला नकोसा
पण,बसलेला ठाण मांडून.
दुसरा मी हवाहवासा
बघेना माझ्याकडे ढुंकून…

एका ‘मी’ला माझं अप्रूप
तर दुसरयाला मीच झालोय नकोसा !
एक मी, अभिमान वाटण्याजोगा
अन्य मी लपवून ठेवावासा….

दोन गैरसमज

08 10 2007

गैरसमज–१
*********
विस्मृती म्हणे एक वरदान आहे; मग गैरसमजाचं काय ?
गैरसमजा बद्दल आपल्या मनात असतात बरेच गैरसमज…..

खरं तर ते आहे मनुष्याच्या आयुष्यातलं एक अदृश्य वरदान,
जे सुसह्य करतं आपल्या वाट्याला आलेलं दान.

आपले समज सगळेच अचूक आहेत,
या गैरसमजाखाली रहाणं काही गैर नाही !

कल्पना करा, आपल्या सगळ्यांच्या मनातले गैरसमज
एका भल्या पहाटे नाहीसे झाले तर ?

आपल्या स्वतःविषयी, इतरांबद्दल असलेले
गैरसमज उराशी कवटाळून आपण
करत असतो वास्तवाशी सामना.

रात्री झोपताना, मी उद्या उठणारच ह्या खात्रीने आपण,
भविष्यातले मनोरे उभारतो;
कोणे एके दिवशी तो समज, गैरसमज ठरतो.
आणि मग सगळ्या समज-गैरसमजांची,
आंधळी कोशिंबीर संपते कायमची…….

पण तोपर्यंत मात्र—

मी कोणीतरी आहे , माझं कोणीतरी आहे,
ह्या गैरसमजामुळेच तर सगळं चाललं आहे !

घराबाहेर पडताना, बाहेरच्या जगाला
आणि कुठुनतरी परतताना आपल्या घरच्यांना
आपली गरज असल्याची नि:संशय खात्रीच तर
आपल्याला प्रवृत्त करत असते या प्रवासाला….

आपल्याशिवाय हे सगळं कोलमडून पडेल,
जे काही आहे ते आपल्यामुळेच,
असल्या गोड गैरसमजांची शाल पांघरून
दिवास्वप्नांच्या झगझगीत उजेडात
भ्रमाच्या भोपळ्यावर स्वार होऊन
आपण टुणुक-टुणुक प्रवासात गर्क असतो…..

वास्तवाचा सूर्य मात्र तेव्हा आपल्याला घेऊन जात रहातो,
क्षितीजाकडे , भ्रमनिरासाच्या .
——————————————————————————————

गैरसमज -२
**********
पृथ्वीतलावर मनुष्यजीवन
येथे विस्मृती मोठे वरदान
त्याहून उपयुक्त आणि महान
पण बदनाम । नामे गैरसमज ॥

सकळांसाठी जो सुलभ, सहज
अखिल मनोव्यापारांचा पूर्वज,
एक स्वर्गीय ऐवज । गैरसमज ॥

त्याचे प्रति आपुले अंतरी
असती बहु पूर्वग्रह परि
तोचि सुसह्य करी ।  मानवी जीवन ॥

स्वतःविषयी अन दुसरयाचे ठायी
गैरसमज कवटाळुनि हृदयी
वास्तवाशी करी हातघाई । मनुष्यप्राणी ॥

माझ्याकरिता हे जग हाले
माझ्याचमुळे हे सर्व चाले,
या गैरसमजामुळेच चाले । जीवनयात्रा ॥

मजवाचुनी कायसे घडेल
जग मी नसता कोलमडेल
माझ्यामागे माझ्यासाठी । ते रडेल, गैरसमज ॥

निघताना घराबाहेरी
परतताना आणिक घरी
इथे अपुलेच असणे जरुरी । हा गैरसमज ॥

मी कुणीतरी आहे,
माझे कुणीतरी आहे
वृथा प्राणि वाहे । हा गैरसमज ॥

आज रात्री जो निजेल
तो हमखासच उद्या उठेल
एके दिवशी तरी चुकेल । हा समज ॥

तोपर्यंत मानव अंतरी,
गैरसमज राज्य करी
वास्तवदर्शन जोवरी  ।  न करी, भ्रमनिरास ॥
 

प्रेम

02 10 2007

खरंच सांगा, खरं प्रेम म्हणजे तरी नेमकं काय हो ?

आपलं संपूर्ण अस्तित्वच सुवर्णमय करुन टाकणारया या प्रेमाची घडणावळच

आपल्या अंतःकरणात होत असताना, त्याचं कारण झालेला परिसस्पर्श आपल्याला

बाहेर का शोधावा लागतो? स्वतःच्याच नाभीतून उमलणारया स्वर्गीय सुगंधाने

वेडावून वणवण भटकणारया कस्तुरीमृगासारखी प्रेमात आपली गत का व्हावी ?
प्रेमाच्या गावाला जाणारा प्रवास म्हणजेच आयुष्य ! या यात्रेत खरं प्रेम नशीबाने

भेटलंच, तर त्याची आपल्याला, आणि आपली त्याला आणि त्या भेटीनंतर

आपली आपल्यालाच– ओळख पटेल कशावरुन ?
मला वाटतं, आपल्याला भावलेलं आपलंच एक गोंडस प्रतिबिंब आपल्या

वाटलेल्या माणसाच्या डोळ्यांत गवसणं म्हणजेच प्रेम !

त्या सोनेरी क्षणांपुरता का होईना, हा अनंत भासणारा अनुभव–

निदान आपल्यापुरता तरी खराच असतो, असं नाही वाटत ?
माझ्याकरता शाश्वत सत्य असलेल्या या अनुभूतीला मी खरं प्रेम मानलं तर

त्यात गैर काय? तो ईश्वर तर प्रेमस्वरूपच आहे ना?

मग माझ्या प्रेमानुभवातलं मला जाणवलेलं देवत्त्व नाकारण्याचा अधिकार मी

दुसरया कुणालाही नाही देणार !
का दोन मर्त्य मानवांकरता हे देवाघरचं देणं खरोखरच अशक्य आहे?

तसं असेल, तर प्रेम शोधत या मृगजळामागे का धावायचं आयुष्यभर ?

आत्मवंचनेचे आणखी सोपे मार्ग आहेतच की !

पण खरंच सांगा, प्रत्येक हळुवार उत्कट भावनेची उलटतपासणी आवश्यकच

आणि शक्य आहे का? मला नाही पटत !
“मिळालं तर फक्त खरंखुरं प्रेमच मला हवंय!” असं म्हणत पूर्णतः निष्प्रेम जीवन

जगत रहायची मिजास नाहीये माझ्याकडे.

…….इतकी श्रीमंत मी कधी होईन असं नाही मला वाटत!
जर ते मिळणार असेल, वीरचक्रासारखं,

प्रचंड इतमामात,

पण……. मरणोत्तर,
तर हवंय कुणाला इथे खर्र खुर्र प्रेम !

मुक्ता

02 10 2007

एकदा कवीला सापडली
विस्मृतीच्या कोनाड्यात, रडवेली
त्याचीच एक कविता, मुक्तछंदातली.
” का गं, रुसलीसशी? ” कवी कसनुसा–
‘मी का नाही हो, तिच्यासारखी ? ‘ मुक्ता मुसमुसली.
” म्हणजे गं कशी?”
‘ जशी तुमची दुसरी कविता…
ती छंदोबद्धा, वृत्तालंकृता-
तिजकडे आहे शब्दलावण्य, पायी यमकांची पैंजणं-
उपमा उत्प्रेक्षांचे मोहक आभास,
आणिक अनुप्रासांचे पदन्यास….
आणि मी ? अशी ओबडधोबड,
वसने जाडीभरडी माझी,
नाजुकपणा न नावालाही
मजकडे न चाल ना वळण,
एक पाय इकडे माझा,
तर दुसरा तिसरीचकडे…
तुमच्याच जर दोन्ही आम्ही दुहिता,
एव्हढी का भिन्न आमची संहिता?
जन्मदात्याकडेच हा आपपरभाव ?’

कवीनं तिला चुचकारलं,
” अशी लिहायची ठरवून
नाही गं होत कविता,
आरंभी नसतंच ठाऊक, पूर्णत्त्वाला जाईल का ही–
झालीच तर होईल केव्हा, कशी ?”

“एका अवचित क्षणी, अवघं भावविश्व व्यापून
उफाळत आलेला एक भाव-विचार,
प्रतिभेशी होऊन तदाकार, होतो सृजनाचा शिल्पकार…..
दुथडी भरून वहाणारया प्रतिभेचा ओघ मग झेपावतो,
अभिव्यक्तीच्या ओढीने  उपजत निष्क्रियतेच्या,
संकोचाच्या बांधांना ललकारत……”

“जाणिवेच्या किनारयांवर या प्रतिभास्पर्शामुळे
फुटू लागतात शब्दांकुर- अजाणताच, अनावर.”

“तेव्हा मी असतो केवळ ह्या असामान्य घटनेचा,
एक मूक साक्षीदार, आणि कळतनकळत हा साक्षीदारच
मग बनून जातो माध्यम या कालप्रेरित निर्मितिचं.”

” प्रत्येक निर्मितिचं, स्वतःचं असं एक असतंच जीवघेणं दु:ख,
आणि असतो एक नवजात आनंदही–
एकामुळे दुसरयाला किंमत,
एकामुळे दुसरयाची रंगत ! ”

कवी अंमळ थबकला, मुक्तेची आसवं पुसून म्हणाला,
” खरं सांगायचं तर तुम्ही
दोघी माझ्याच अंतरीच्या उर्मी,
डाव्या-उजव्याला नसतं तिथं स्थान !
नवनिर्माणाच्या घटिकेला, एव्हढं असतं कुठे भान ? “

कैफियत

28 09 2007

तू बोलतेयस खूप काही
पण ते मला समजलेलंच नाही
समजून चुकलोय मी दुसरंच काही
जे तू कधी सांगितलंच नाही.

जे समजलंय ते फारसं
मला आवडलेलं नाही…
पण माझ्या आवडी-निवडीचं
तसं तुला काहीच पडलेलं नाही !

माझ्याकडे ज्याचं उत्तर आहे,
असा प्रश्न तुझ्याकडे नाही,
मला हवे असलेले प्रश्न तू
विचारायचा प्रश्नच येत नाही….

तुला प्रश्न विचारायची
मला कुठे छाती आहे ?
उत्तरादाखल जे ऐकावं लागेल
त्याची मनोमन भीती आहे.

मला जेव्हा कधीकाळी
तुला खूप सांगावंसं वाटेल
तेव्हातरी तुलाही….

ते ऐकावंसं वाटेल ?

मला बोलायचं असतं तेव्हा
तुलाही ऐकावंसं वाटावं,
मी जीवाचा कान करीन
तेव्हा तुलाही बोलायचं सुचावं.

माझे शब्द कष्टाने बाहेर पडतात,
त्यांच्याआड भित्र्या भावना दडतात.
माझं बोलणं ? त्याचं काही खरं नाही
तोंड उघडून नुसतं अश्रू ढाळणं बरं नाही…..

या वाहत्या आसवांचा दोष
तुझ्या माथ्यावर का यावा?
अपराधी भावनांचा बोजा
तू डोक्यावर का घ्यावा?

तू डोक्यावर घ्यावंस असं
आहे काय माझ्याकडे!
एक माझ्या दु:खाचं गाठोडं,
ते बरंय माझं माझ्याकडे.

माझी चूक आहे, माझ्या अपेक्षा….

आणखी चुका असतील, नव्हे आहेतच.
खंत आहे, पण तुझ्यावर रोष नाही;
चुका माझ्या, माझ्याच आहेत
त्यात तुझा काही दोष नाही.