Archive for the ‘मराठी कविता’ Category

कवायत

11 09 2007

एकदा कवी, ‘ कविता लिहायची’ ठरवून,
पुढ्यात कागद ओढून,
त्यावर काटकोनात ले़खणी ठेवून
जय्यत तयारी करून,
बसला बैठक मारुन , पण…
काही केल्या स्फुर्ती येईना,
पुढचा शब्द त्याला सुचेना.

कवी हट्टाला पेटला,
‘ आज करायचीच ‘ पुटपुटला, आणि
झाली सुरुवात खोगीरभरतीला.

इकडून तिकडून ऐकले- वाचलेले
शब्द कच्चे- अर्धवट भाजलेले
कल्पनेतच ऊबवलेले, मात्र
वास्तवाची धग कधीच न लागलेले….

तीव्र इछ्छेच्या कढईत, बळेच
त्या शब्दा-वाक्यांना लोटून,
अहंकाराच्या प्रखर आचेवर
कवितेचे आधण ठेवून,
हाती बेताच्या अनुभवाचा झारया घेऊन
यमकांची बुन्दी पाडायला,
कवी लागला काव्य ढवळायला—
यथावकाश मनातून लेखणीत,
अन तिथून कागदावर, भरभर
ऊतरले ते शब्द अनेक
एकच गिल्ला करू लागले, म्हणाले,
” तुम्हीच जमवलेल्या आम्हा बाजारबुणग्यांची
कशी वाटतेय कवायत ? “

कविता

11 09 2007

एक बातमी आलीये , माझ्या दोस्ताला म्हणे बरं नाही

काल परवापर्यन्त बरा होता, पण हल्ली काही खरं नाही

पिन्जारलेले केस अन् चुरगळलेला वेष,

चप्पल आंगठा तुटलेली, गळा शबनम लटकलेली

सैरभैर चित्त आणि , हाती कागद लेखणी

मुद्रेवर पहिलटकरी भाव,

सतत काहीतरी हरवल्याचा आव

रस्त्यात अचानक थांबतो, स्वतःशीच बडबडतो

झोळीतला कागद काढून काही बाही खरडतो

रोजच्याच गोष्टीत त्याला नवे अर्थ दिसतायत

चांगलं-चुंगलं ऐकावं,वाचावं अश्या इच्छा होतायत

का कोण जाणे जीवाची फार घालमेल होतेय

पावलागणिक त्याला नवीन ओळ सुचतेय

त्याला म्हणे वैद्याकडे नेऊन,

विचारलं त्याची नाडी दाखवून,

की ‘ माझं नक्की काय होणार आहे ? ‘

उत्तर मिळालं, ” अभिनंदन,

तुम्हाला लवकरच एक कविता होणार आहे ! “