Archive for the ‘मराठी कविता’ Category

दोन गैरसमज

08 10 2007

गैरसमज–१
*********
विस्मृती म्हणे एक वरदान आहे; मग गैरसमजाचं काय ?
गैरसमजा बद्दल आपल्या मनात असतात बरेच गैरसमज…..

खरं तर ते आहे मनुष्याच्या आयुष्यातलं एक अदृश्य वरदान,
जे सुसह्य करतं आपल्या वाट्याला आलेलं दान.

आपले समज सगळेच अचूक आहेत,
या गैरसमजाखाली रहाणं काही गैर नाही !

कल्पना करा, आपल्या सगळ्यांच्या मनातले गैरसमज
एका भल्या पहाटे नाहीसे झाले तर ?

आपल्या स्वतःविषयी, इतरांबद्दल असलेले
गैरसमज उराशी कवटाळून आपण
करत असतो वास्तवाशी सामना.

रात्री झोपताना, मी उद्या उठणारच ह्या खात्रीने आपण,
भविष्यातले मनोरे उभारतो;
कोणे एके दिवशी तो समज, गैरसमज ठरतो.
आणि मग सगळ्या समज-गैरसमजांची,
आंधळी कोशिंबीर संपते कायमची…….

पण तोपर्यंत मात्र—

मी कोणीतरी आहे , माझं कोणीतरी आहे,
ह्या गैरसमजामुळेच तर सगळं चाललं आहे !

घराबाहेर पडताना, बाहेरच्या जगाला
आणि कुठुनतरी परतताना आपल्या घरच्यांना
आपली गरज असल्याची नि:संशय खात्रीच तर
आपल्याला प्रवृत्त करत असते या प्रवासाला….

आपल्याशिवाय हे सगळं कोलमडून पडेल,
जे काही आहे ते आपल्यामुळेच,
असल्या गोड गैरसमजांची शाल पांघरून
दिवास्वप्नांच्या झगझगीत उजेडात
भ्रमाच्या भोपळ्यावर स्वार होऊन
आपण टुणुक-टुणुक प्रवासात गर्क असतो…..

वास्तवाचा सूर्य मात्र तेव्हा आपल्याला घेऊन जात रहातो,
क्षितीजाकडे , भ्रमनिरासाच्या .
——————————————————————————————

गैरसमज -२
**********
पृथ्वीतलावर मनुष्यजीवन
येथे विस्मृती मोठे वरदान
त्याहून उपयुक्त आणि महान
पण बदनाम । नामे गैरसमज ॥

सकळांसाठी जो सुलभ, सहज
अखिल मनोव्यापारांचा पूर्वज,
एक स्वर्गीय ऐवज । गैरसमज ॥

त्याचे प्रति आपुले अंतरी
असती बहु पूर्वग्रह परि
तोचि सुसह्य करी ।  मानवी जीवन ॥

स्वतःविषयी अन दुसरयाचे ठायी
गैरसमज कवटाळुनि हृदयी
वास्तवाशी करी हातघाई । मनुष्यप्राणी ॥

माझ्याकरिता हे जग हाले
माझ्याचमुळे हे सर्व चाले,
या गैरसमजामुळेच चाले । जीवनयात्रा ॥

मजवाचुनी कायसे घडेल
जग मी नसता कोलमडेल
माझ्यामागे माझ्यासाठी । ते रडेल, गैरसमज ॥

निघताना घराबाहेरी
परतताना आणिक घरी
इथे अपुलेच असणे जरुरी । हा गैरसमज ॥

मी कुणीतरी आहे,
माझे कुणीतरी आहे
वृथा प्राणि वाहे । हा गैरसमज ॥

आज रात्री जो निजेल
तो हमखासच उद्या उठेल
एके दिवशी तरी चुकेल । हा समज ॥

तोपर्यंत मानव अंतरी,
गैरसमज राज्य करी
वास्तवदर्शन जोवरी  ।  न करी, भ्रमनिरास ॥
 

मुक्ता

02 10 2007

एकदा कवीला सापडली
विस्मृतीच्या कोनाड्यात, रडवेली
त्याचीच एक कविता, मुक्तछंदातली.
” का गं, रुसलीसशी? ” कवी कसनुसा–
‘मी का नाही हो, तिच्यासारखी ? ‘ मुक्ता मुसमुसली.
” म्हणजे गं कशी?”
‘ जशी तुमची दुसरी कविता…
ती छंदोबद्धा, वृत्तालंकृता-
तिजकडे आहे शब्दलावण्य, पायी यमकांची पैंजणं-
उपमा उत्प्रेक्षांचे मोहक आभास,
आणिक अनुप्रासांचे पदन्यास….
आणि मी ? अशी ओबडधोबड,
वसने जाडीभरडी माझी,
नाजुकपणा न नावालाही
मजकडे न चाल ना वळण,
एक पाय इकडे माझा,
तर दुसरा तिसरीचकडे…
तुमच्याच जर दोन्ही आम्ही दुहिता,
एव्हढी का भिन्न आमची संहिता?
जन्मदात्याकडेच हा आपपरभाव ?’

कवीनं तिला चुचकारलं,
” अशी लिहायची ठरवून
नाही गं होत कविता,
आरंभी नसतंच ठाऊक, पूर्णत्त्वाला जाईल का ही–
झालीच तर होईल केव्हा, कशी ?”

“एका अवचित क्षणी, अवघं भावविश्व व्यापून
उफाळत आलेला एक भाव-विचार,
प्रतिभेशी होऊन तदाकार, होतो सृजनाचा शिल्पकार…..
दुथडी भरून वहाणारया प्रतिभेचा ओघ मग झेपावतो,
अभिव्यक्तीच्या ओढीने  उपजत निष्क्रियतेच्या,
संकोचाच्या बांधांना ललकारत……”

“जाणिवेच्या किनारयांवर या प्रतिभास्पर्शामुळे
फुटू लागतात शब्दांकुर- अजाणताच, अनावर.”

“तेव्हा मी असतो केवळ ह्या असामान्य घटनेचा,
एक मूक साक्षीदार, आणि कळतनकळत हा साक्षीदारच
मग बनून जातो माध्यम या कालप्रेरित निर्मितिचं.”

” प्रत्येक निर्मितिचं, स्वतःचं असं एक असतंच जीवघेणं दु:ख,
आणि असतो एक नवजात आनंदही–
एकामुळे दुसरयाला किंमत,
एकामुळे दुसरयाची रंगत ! ”

कवी अंमळ थबकला, मुक्तेची आसवं पुसून म्हणाला,
” खरं सांगायचं तर तुम्ही
दोघी माझ्याच अंतरीच्या उर्मी,
डाव्या-उजव्याला नसतं तिथं स्थान !
नवनिर्माणाच्या घटिकेला, एव्हढं असतं कुठे भान ? “

कैफियत

28 09 2007

तू बोलतेयस खूप काही
पण ते मला समजलेलंच नाही
समजून चुकलोय मी दुसरंच काही
जे तू कधी सांगितलंच नाही.

जे समजलंय ते फारसं
मला आवडलेलं नाही…
पण माझ्या आवडी-निवडीचं
तसं तुला काहीच पडलेलं नाही !

माझ्याकडे ज्याचं उत्तर आहे,
असा प्रश्न तुझ्याकडे नाही,
मला हवे असलेले प्रश्न तू
विचारायचा प्रश्नच येत नाही….

तुला प्रश्न विचारायची
मला कुठे छाती आहे ?
उत्तरादाखल जे ऐकावं लागेल
त्याची मनोमन भीती आहे.

मला जेव्हा कधीकाळी
तुला खूप सांगावंसं वाटेल
तेव्हातरी तुलाही….

ते ऐकावंसं वाटेल ?

मला बोलायचं असतं तेव्हा
तुलाही ऐकावंसं वाटावं,
मी जीवाचा कान करीन
तेव्हा तुलाही बोलायचं सुचावं.

माझे शब्द कष्टाने बाहेर पडतात,
त्यांच्याआड भित्र्या भावना दडतात.
माझं बोलणं ? त्याचं काही खरं नाही
तोंड उघडून नुसतं अश्रू ढाळणं बरं नाही…..

या वाहत्या आसवांचा दोष
तुझ्या माथ्यावर का यावा?
अपराधी भावनांचा बोजा
तू डोक्यावर का घ्यावा?

तू डोक्यावर घ्यावंस असं
आहे काय माझ्याकडे!
एक माझ्या दु:खाचं गाठोडं,
ते बरंय माझं माझ्याकडे.

माझी चूक आहे, माझ्या अपेक्षा….

आणखी चुका असतील, नव्हे आहेतच.
खंत आहे, पण तुझ्यावर रोष नाही;
चुका माझ्या, माझ्याच आहेत
त्यात तुझा काही दोष नाही.

तुझी कविता

26 09 2007

तू मला भेटतच नाहीस एकटा
बरोबर असतेच तुझी कविता
तुला नाही वाटत भेटावंसं
वेगवेगळं आम्हा दोघींना ?

वाटतं, तू तिच्यात मला बघतोयस, अन्
माझ्यात शोधतोयस तिला.

तिच्याशी बोलतोस माझ्याकडे पाहात,
आणि मला मात्र वाटत रहातं
की तू मलाच काहीतरी सांगतोयस.

तू माझ्याशी बोलत असताना
तुझी कविताच दिसते मला, तुझ्याकडे बघताना.

डोळे मिटून तू कधी गप्प रहातोस
तेव्हा आम्ही दोघी बघत रहातो
एकमेकींच्या तोंडाकडे, हे न समजून
की तुला आता नक्की कोण
हाक मारणार, हक्कानं ?

तिच्याशिवाय तुला पहायचंय एकदा.
पण तिला तुझ्याशिवाय आहे कोण दुसरं !
मला मात्र तू आहेस… आहेस ना?

हल्ली मात्र येतोय मला संशय.
मी आहे का खरंच आयुष्य तुझं,
का आहे केवळ एक काव्यविषय ?

आपल्या दोघांना

23 09 2007

गोष्ट फार जुनी नाही….

तेव्हा पहात होतो
झाडाखाली चोरुन भेटताना
तळ्याकाठी रमताना
बागेत स्वच्छंद भटकताना
वेळीअवेळी, कधी भर पावसात
लोकांना  नवनवीन कारणं देत,
एकमेकांच्या डोळ्यांत बघत
तेव्हा दिवस नव्हता पुरत,
आपल्या दोघांना !

पण आताशा पहातोय,
घडी हळूहळू विस्कटताना
होतायत विसंवाद, वितंडवाद
आणि कलहाचा घंटानाद.
हल्ली पहावं लागतंय
एकमेकांशी अकारण भांडताना.
लोक आजही कारणं विचारतायत,
आपल्या दोघांना.

पाहिलेलं कुठलं खरं समजावं-
नक्की काय बिनसलंय, कुणी सांगावं-
या नात्याचं आता काय करावं-
हे समजणार आहे का कधीतरी,
आपल्या दोघांना ?

मराठीSMS

23 09 2007

काय लिहावे काही सुचेना
जे लिहिले ते मला रुचेना
लिहिल्याविण परि राहवेना
वियोग हा मज साहवेना.
********************
सागराची ही निळाई
सांडियली कुणी शाई
धरु हातात लेखणी
अन् लिहू काहीबाही.
********************
आज पहाटं पहाटं
सुचल्या या चार ओळी
देऊ का रं पाठवून
तुले छोटीशी चारोळी ?
*******************
भल्या पहाटंच्या पारी
मले आली तुजी सय
रोजचा पाठीव संदेस,
लई झालीया सवय !
*******************
होत आली संध्याकाळ
या सावल्या लांबल्या
आठवणी ज्ञुन्यापान्या
दारावरीच थांबल्या.
******************
सूर्य आला माथ्यावर
गात्रं आणि सैलावली
आळसावली दुपार
सावलीही विसावली
*****************
आनंदगंध अनिर्बंध
आसमंतात ऊधळ
येत राहील बराच काळ
तुझ्याच अंगाला दरवळ
****************
सोनेरी किरणांची
पहाटगंधांच्या दरवळीची
मंजुळ किलबिलींची
मुलायम वायुलहरींची
मधुर मधुपानाची…. सुप्रभात !
*****************
फुलांवरी दवबिन्द
आसमंती मृदगंध
ही ओलेती पहाट,
चिंब, स्वच्छंद !
****************
पहाटवारा घेऊन उरी
उडाले पक्ष्यांचे थवे,
घे तूही उंच भरारी,
मिळो ते जे तुला हवे !
****************
बाहेर गजबज, वर्दळ
पहावं तिथे मनुष्य.
मनातला रस्ता….
निर्मनुष्य.
***************
सकाळीच नभोमंडपात
अडचण होऊन बसलीय
तुझ्या SMS करता
पहाटमाय रुसलीय!
**************
निसर्गानं नवाकोरा
दिवस आरंभलाय
पाठवा SMS झकास,
Morning walk खोळंबलाय!
*************
करून न्याहारी
बांधून शिदोरी
पहाटंच्या पारी
निघे कष्टकरी.
***********
पुन्हा आला सोमवार
हा का हो येतो वरचेवर ?
रविवार तो बिचारा
पाही वाट आठवडाभर !
***************
रविवारच्या पहाटे
डोळ्यांवर पेंग दाटे
मोडून घड्याळाचे काटे
पुन्हा झोपावेसे वाटे.
***************
एसएमएसच्या पोतडीतून
काढियल्या चार ओळी
अन् दिली पाठवून
तुझी पहाटेची गोळी !
**************
सकाळी मना,
मोबाइल ऊघडावा
लगोलग सुप्रभातीचा
संदेश त्वां धाडावा.
***************
रात्र गडद काळी
MSEB आमच्या कपाळी
घेऊन संदेश नवा,
भेटू उद्या सकाळी.
**************
म्हणे ” निंदकाचे घर
असावे शेजारी.”
का बुवा, लग्न करून
एक आणतोच की आपण घरी !
***************

” आमची कुठेही शाखा नाही.”

अशी शंका कुणाला येईल ही

शंका तुम्हाला का यावी , कळत नाही!

************************

सूचना: ” दर्शनाकरिता मंदिराच्या

डावीकडून रांग लावावी.

रांग मोडणार्‍यांकरिता

रांग उजवीकडे आहे.”

***********************

इतरांच्या नजरेला नजर

सहज भिडवता येते;

आरशासमोर मात्र,

थोडी पंचाईत होते !

**********************

काहीतरी सांगावंसं वाटणं

होतं संवादाला कारण

नेहेमीसाठी ते सापडणं

हेच मैत्रीचं लक्षण !

**********************

एका ‘बी पॉझिटीव्ह’ कवीला

एक डास कडकडून चावला

बसली चापट, डास उठला

गावभर सांगत सुटला,

” हा तर पक्का निगेटिव्ह निघाला !”

*********************

“गर्दीच्या ठिकाणी फेरीवाल्यांस

सक्त मनाई आहे.”

शहराबाहेर त्यांच्यासाठी वेगळी

व्यवस्था करण्यात आली आहे !

*********************
सनई ताशे नगारे

वाजवा वाजवा रे

संसारमंचावर होतोय नाट्यारंभ

मिळून नांदी करुया रे,

म्हणुया, ” नांदा सौख्यभरे !”

*******************
पार्लरमधून ती परतली

पुन्हा तरुण होऊन,

पण त्याला जवळ येऊ देईना:

म्हणे ” रंग ओला आहे अजून!”

************************

वैधानिक ईशारा:

स्वयंपाकाला न्याय द्यायच्या नादात

पोटावर अन्याय होऊ देऊ नका !

************************

सिरियल

21 09 2007

कालगणनेपासून सुरु असलेलं
आयुष्य नामक एक न संपणारं सिरियल

त्याचा देव निर्माता, आणि दैव दिग्दर्शक….

त्यात ‘ कमर्शिअल ब्रेक्स ‘ सुख-दु:खांचे,
कमी-अधिक काळांचे,

वेगवेगळे स्वर आणि सूर शीर्षकगीतांचे.

त्याला नेपथ्य भावभावनांच्या चढउतारांचं ,
तर पार्श्वसंगीत भिन्न मनुष्यस्वभावांचं.

या सिरियलचे तुम्ही-आम्हीच
कलाकार, प्रेक्षक, समीक्षक– सब कुछ

माझ्या एपिसोडला कधी तुम्ही प्रेक्षक, तर
तुमच्या कथानकाचा कधी मी साक्षीदार

दैववशात् आपल्या सगळ्यांच्या हालचाली,
प्रत्येक भागातली पात्रयोजना निराळी.

काही सदैव मेकअप मध्ये तयार,
बरेचसे स्टेज फीअरने बेजार

कधी एन्ट्रीला टाळ्या अन् एक्झिटला हुंदके,
पण सगळ्यांसाठीच नाही…..

कथानकात उपकथानकं, गुंतागुंतीची नाटकं
त्यात काहींना नेहेमी प्रमुख भूमिका,
काही नामवंत, खूपश्या अनामिका

काहींच्या एपिसोडला मिळून जातात सहज
कौतुकाचे प्रायोजक,
आणि काहींना लाभत नाहीत शेवटपर्यंत,
तर कुणाला नकोच असतात फारसे प्रेक्षक

काहींचे एपिसोडस् कंटाळवाणे,
प्रदीर्घ चालूच रहातात
दिग्दर्शकाच्या लहरीप्रमाणे, तर
काहींचे हुरहूर लावून
वेळेआधीच संपतात.

कमर्शिअल ब्रेक

19 09 2007

तुम्ही विश्रांती घ्यायला निघालात.
जायच्या आधी आम्हाला मात्र
सांगता डोळे वटारुन, बजावून
एक तर्जनी नाचवत, लाडिक धमकी देत:
” आम्ही लगेच परत येतोय, ब्रेकनंतर
तुम्ही बसा हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून–
कुठेही जायचं नाही, बरं का ?”

तुम्ही आमची नाडी बरोब्बर पकडलीय;
जाहिरातींच्या वेड्यावाकड्या सरींना
धैर्यानं तोंड देत आम्ही तुमची
वाट बघत बसणार, तुम्हाला माहितीय…..

आता तरी काही मनासारखं
पहायला- ऐकायला मिळेल ह्या अमर आशेवर,
नकोश्या झालेल्या माणसांसारखे
तुमचे ब्रेक्स सहन करत आम्ही
प्रतीक्षेत आहोत तुमच्या परतण्याची,
वर्गाबाहेर उभं केलेल्या
शाळकरी मुलासारखी !

तुम्ही परत येऊ म्हणताय, या बापडे.
या जाहिरातींमधून जगलो-वाचलो तर,
आपली भेट होईलच लवकर….

शुभेच्छा

16 09 2007

लक्षात राहू नये
एवढी नवी नाही, आणि
चक्क विसरून जावे
एवढी जुनीही नाही…..

अशी आपली मैत्री !

ज्यांच्या शुभेच्छापत्राकरिता
उतावीळपणे वाट पहातो
आपण , आपल्याच
वाढदिवसाची……

अश्या माझ्या ह्या
नव-मित्राचं मन:पूर्वक
अभीष्टचिन्तन , त्याच्या
जन्मदिनानिमित्त !

आमच्या शुभेच्छा सदैव आहेतच;
त्या तुमच्यापर्यन्त पोहोचवायला ,
तुमचा वाढदिवस ही एक सबब !

काव्यप्रवेश

16 09 2007

एखादी अनुभूती, सत्य वा कल्पित
करते भावनिर्मिति ,

अन भावना पुरेश्या बळावल्या
की न राहवून, चाळवते प्रतिभा.

मुक्या प्रतिमांची मग सुरु होते धावपळ;

त्यांच्या भोवती फेर धरुन प्रियाराधन करु लागतात
काही  बोलघेवडे शब्द , अनुरुप अन चपळ.

शिस्तप्रिय रचनाशास्त्र त्यांना घालू पाहातं
वृत्त-अलंकारांचं बंधन,

रचनेचं सौष्ठव करायला लावतं
भावनांशी  तडजोड, पण कधीकधी
होतं त्याचं एक सुरेखसं कोंदण….

तर कधी होतच रहातो मुक्तछंदी, बेगुमान
शब्द- प्रतिमांचा लपंडाव, रुढींना गुंगारा देऊन.

कविमन थबकून हा व्यापार पाहू लागतं-

हा हा म्हणता साकारु लागतो एक आकृतिबंध,
त्यानं पुरेसं बाळसं धरलं, की
येऊ लागतो अभिव्यक्तीचा अभिनिवेश

आणि यथावकाश, घटिका भरली की
संपन्न होतो काव्यप्रवेश !