Archive for the ‘मराठी कविता’ Category

कोजागरी

26 10 2007

गोड पांढर्‍याफेक बत्ताशासारख्या

शारद टपोर चंद्रबिंबाचा,

आटीव ओतीव फेसाळ दुधाच्या

आधणावरल्या उधाणाचा

मित्रवर्तुळातल्या नाच-गाण्यांचा

घरोघरीच्या जागरणांचा,

सण कोजागरीचा !

अस्तित्त्व

23 10 2007

अभिव्यक्तिपुरता,

जिचा वियोग मी जेमतेम सहन करतो,

अहो, ती माझी कविता,

माझं कवित्त्व,

हेच माझं व्यक्तित्त्व

माझं सर्वस्व… नव्हे, माझं अस्तित्त्वच !

ती माझी कविताच झिडकारताय,

आणि एकट्या मलाच

मायेनं आपलं म्हणू पहाताय !

जन हो, माझं काव्य नाही नुसतं एक वाक्य,

ते तर  माझं जीवनवाक्य…..

त्या वाक्यात शब्द,

शब्दांमागे आहे भाव

त्या भावातच लपलाय

माझ्या मनीचा गाव.

त्या शब्दांत घुमतोय एक  नाद,

ह्या नादातच गुंतलाय….

माझा अंतर्नाद !

माझं हे वेगळेपण…

तेच नाकारताय,

मग मला कुठल्या सलगीनं हाकारताय ?

विजयादशमी

21 10 2007

विजयादशमीचा दिन, अंगण सडासंमार्जन

वर रंगावलीचं लेणं, दारोदारी तोरणं

धूप-दीप प्रज्वलन, सुगंधित वातावरण

कौतुकाची पक्वान्नं, आप्तेष्ट-मित्र मीलन

मनी सुख समाधान, करू सीमोल्लंघन

वाटू आपट्याची पानं, सवे मैत्रीचं सोनं !

जे जे हवं

21 10 2007

आपल्याला जे जे हवं, तेच दुसरयालाही द्यावं
आंब्याचं फळ असेल हवं, तर जमिनीला वांग्याचं बीज का द्यावं ?

जे जे तुम्हाला पहायला हवं, तेच इतरांनाही दाखवावं
जे तुम्हाला वाटतं ऐकावं, तेच तुमच्या श्रोत्यांनाही ऐकू यावं

जे जे तुम्हाला घ्यायला हवं, तेच दुसरयालाही द्यायला हवं
स्वतःला तर सगळं नवीन हवं; मग दुज्याने जुनं का घ्यावं ?

जर अपेक्षापूर्तीचं दान हवं, तर इतरांच्या इच्छेचं सदा भान हवं
मनात सदैव समाधान हवं, तर तुमचं वागणंही तसंच छान हवं !

आयुष्यात रोजच कौतुक हवं, तर का ठेवावी लोकांना नावं ?
सुख जर हक्काचं हवं, ते दुसरयाला दुखवून कसं बरं मिळावं ?

स्वतःच्या मनातलं इतरांनी ओळखायला हवं ?
मग तुम्हालाही थोडंसं मनकवडं व्हायला हवं !

सर्वांनी तुमच्या प्रेमात पडावं, असं काही हातून घडावं
दुसरयाचा गुंता सोडवून बघावं,
तुम्हालाही जीवनाचं कोडं उलगडावं !

रविवार

14 10 2007

तो सहा दिवस उभा असतो, इतरांच्या मागे
शांतपणे, आपल्या पाळीची वाट पहात.

शनिवार दुपारपासून तो दिसू लागतो,
काही भाग्यवंतांना शुक्रवारपासूनच!

आठवड्याची अव्याहत कदमताल आपण सहन करतो,
त्याच्यावर ठामपणे नजर ठेवूनच…..

दररोज करावीशी वाटून एकदाही होऊ न शकलेली,
आणि नकोशी झालेली, कंटाळवाणी पण आवश्यक
अशी सगळी कामं त्याच्या हवाल्यावर सोडून,
सारया अपूर्ण आशा-आकांक्षांचं बोचकं
त्याच्या खुंटीला टांगून…..

करकचून मुसक्या बांधलेल्या आयुष्याला
काही काळापुरतं तरी सैल सोडण्याचं स्वप्न पहात
आपण त्याच्या वाटेकडे डोळे लावून रहातो.

सातां दिवसांपलिकडच्या त्या रविवाराला मात्र माहित असतं,
आठवड्यातनं एकदाच येतो, म्हणूनच आपलं महत्त्व असतं !

सरकार

14 10 2007

सरकार आपलं असं असावं –  जागरूक, कर्तव्यपरायण असावं
माझ्या वाट्याच्या जबाबदारयांशी मात्र, त्याला काही कर्तव्य नसावं

सरकार आपलं – जनहितरक्षक, लोकप्रतिपालक असावं
माझ्या अवसानघातकीपणाकडे मात्र, त्याचं पुरेसं लक्ष नसावं

सरकार आपलं – कनवाळू, मानवतावादी असावं
माझ्या अमानुष वर्तनाकडे मात्र, त्याचं सोईस्कर दुर्लक्ष असावं

सरकार आपलं – सर्वधर्मसमावेशक, सहिष्णु असावं
माझ्या उन्मत्त उतावीळपणाचंही, त्याला तितकंच कौतुक असावं

सरकार आपलं – नि:पक्षपाती, नीतिमान असावं
माझ्या नैतिक दिवाळखोरीला मात्र, त्याचं आव्हान नसावं

सरकार आपलं – प्रजासत्ताक, लोकतंत्र असावं
माझ्या स्वायत्त मनमानीचंही, इथे समर्थन असावं

सरकार आपलं – उदारमतवादी, विश्वबंधुत्त्वाचं असावं
माझ्या कूपमंडूक वृत्तीलाही, इथे मानाचं स्थान असावं

सरकार आपलं – वैभवशाली, सुखसंपन्न असावं
माझ्या कद्रूपणाचं मात्र, त्याला कधी वावडं नसावं

सरकार आपलं – संस्कृती, इतिहास जपणारं असावं
माझ्या बिनबुडाच्या परंपरावादाचं,  त्याला तितकंच अप्रूप असावं.

सरकार आपलं कसं  पुरोगामी, गतिमान असावं,
निष्क्रिय ओझं बनून रहायचं मला, व्यक्तिगत स्वातंत्र्य असावं !

बायको

13 10 2007

अशी आपली बायको असावी – हजार जणींत उठून दिसावी
थोडीसुद्धा तिला मात्र, त्याची मिजास नसावी

अशी आपली बायको – भक्कम पगाराची,कायम नोकरीची असावी
मी म्हणेन तेव्हा मात्र, ती मला घरीच दिसावी

अशी आपली बायको – चतुर, शहाणी,अभिमानी असावी
नम्रपणे माझ्यापुढे मात्र, मान तिची खाली असावी

अशी आपली बायको – सभेत धीट, कामाला वाघ असावी
माझ्यासमोर घरीदारी मात्र, ती गरीब गाय असावी

अशी आपली बायको – बोले तैसी चालणारी असावी
माझ्या जुन्या वचनांची मात्र, तिला कधी आठवण नसावी

अशी आपली बायको – प्रसन्न, सदा हसतमुख असावी
माझ्या आक्रस्ताळीपणावर मात्र, तिच्या भाळी आठी नसावी

अशी आपली बायको – शांत गंभीर, पोक्त असावी
माझ्या बालिशपणाविषयी मात्र, तिची काही प्रतिक्रिया नसावी

अशी आपली बायको – व्यवहारी, काटकसरी असावी
माझ्या उधळपट्टीवर मात्र, तिची कधी टीका नसावी

अशी आपली बायको – एक आदर्श गृहिणी असावी
माझ्या ढिसाळपणाबद्दल मात्र, तिची काही तक्रार नसावी

अशी आपली बायको  – सुसंस्कृत माता असावी
माझ्या बेबंद वागण्याची मात्र, मुलाबाळांवर सावली नसावी

अशी आपली बायको असावी – माझ्यापलिकडे तिची दृष्टी नसावी
मी खिडकीबाहेर बघण्याला मात्र, तिची कधी हरकत नसावी !

आभाळ वेडे

10 10 2007

प्रतिभायोगे एकदाची, घटिका भरली निर्माणाची
यथावकाश ओघवली, कविता इवलीशी नवसाची.

हळूहळू दिसामासी, वाढू लागे कविता तैसी ,आनंद बहु कविमानसी
चिंता परी लगोलग त्यासी, तिच्या पुढल्या प्रवासाची.

कधी कविचे बोट धरुनी, कधी त्याच्या कडेवरुनी
कविसंमेलनी, काव्यवाचनी, कविसंगे कविताही जाऊ लागली.

बहरून सर्वांगी झाली थोर, कविमना लागे घोर
हिला अनुरूप तालेवार, मिळे कोण असा रसिकवर ?

धीर करुनी मग कविराव, शोधे फिरे गावोगाव
मुद्रेवरी वधुपित्याचे भाव, त्याच्या काव्यवाचना वाव
परि कुठे मिळेना,
दामटावे घोडे पुढे आपुले हे धाडस त्याला होईना !

सोन्यावाणी लेक लाडकी, तिला मिळेल का कुणी रत्नपारखी….
मिळेल का स्नेही हितचिंतक, काव्यप्रेमी अन् दर्दी वाचक?

परि कविला पुरते ठाऊक,
येते जेथुन काव्य तेथुनच, येती ते गुणग्राहक रसिक….
नशिबावरि ठेवून हवाला, प्रकाशना धाडिले तियेला
काळ बहु लोटियला पण, देईना कुणी होकाराला.

कालगतीने एके दिवशी, गेला तो कवि निजधामासी
पंचत्त्वी तो  विलीन होई, परि चित्त तयाचे मागे राही,
नभातुनी तो पाहत राही.

नित्यनेमे मग कविता ती, बसे येऊनी ओढ्यावरती
येई तिथे मग एके मिती, स्वार शुभ्र घोड्यावरती
तृषार्त शोधक  वाचक एक, सौंदर्याचा नित्य उपासक
कवितेवरी ध्यान आपसुक, पडे दृष्टी अन् होई भावुक.

म्हणे,’ कोण गे तू रुपवती, सुलक्षणी ऐश्वर्यवती
कोण कुल अन् कवण पिता तव, वसशील का तू माझे चित्ती ?’

खिन्न हासुनी कविता मग बोले, “वाट पाहुनी बाबा गेले,
रसिकराज उशिराने आले,
पण कुणावरही मी नाही रुसले,
आम्हा कवितांचे हे नशिबच असले….
बहु करवलित तुम्ही प्रतीक्षा,  सफल आज मम सत्त्वपरीक्षा!”

रसिकहृदयी मग ती डोले,
हर्ष मानसी परि नयन ओले
नभाकडे पाहुन ती बोले,
“बघा, ते आले !”
आभाळ वेडे –अपुल्याशीच मग
कृतार्थपणे, गदगदून हसले !

भोंडला

08 10 2007

शनिवारी, संध्याकाळ झाली तशी ग्रंथालयाची दालनं बंद होऊ लागली.
दिवे मालवत येत असताना, दर्शनी भागात असलेल्या काव्यविभागातल्या 
काव्यप्रकार आणि आकाराप्रमाणे कपाटांच्या खान्यांत हारीने मांडून ठेवलेल्या

पुस्तकांवर शेवटची नजर फिरवून दरवाज्याला  उद्याच्या सुटीकरता कुलुप

लावायला ग्रंथपाल मुख्यद्वाराकडे निघाला.
त्याची पाठ वळते तोच हाळी आली, ” चला गं , तो गेला !”,  आणि सुरुवात

झाली, काव्यविभागाच्या भोंडल्याला. भराभरा उघडलेल्या खिडक्यांतून बरसणारया

चंद्रप्रकाशात रंगलेल्या या सोहळ्याच्या निमंत्रितांबद्दल हा पेज थ्री वृत्तांत……….
*************************************************************

 भोंडला

******

ग्रंथालयाच्या काव्यविभागातल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होत होती……

”  चला चला गं , भोंडल्याला ! ”
साद आली , आणि एकच गिल्ला झाला.
जिन्यांमधून धडधडा उतरण्याचा आवाज येऊ लागला.

कुणालाही काहीबाही बोलणारी वात्रटिका,
होती कार्यक्रमाची निमंत्रिका.
तिच्याबरोबर होती –चाकोरीबाहेरची
नवकविता, बंडखोर जीन्सच्या सवयीची, 
आणि किलकिल्या डोळ्यांची
एक पाहुणी हाइकू, अगदीच तोकड्या कपड्यांची.

स्वागतगीताने आरंभ करी, उच्चरवा नांदी सुलक्षणी
त्यांना बघून सभास्थानी,
जमू लागल्या भोंडलेकरणी.
 
एक बनून आली  एक लाजरं सुनीत, 
नुकतंच चौदावं सरलेली, चांगलीच बावरलेली
आश्वासक साथ तिला देण्या
दुसरी आली बनून उखाणा,
सवयीचं नाव घेऊन बरीचशी सावरलेली.
 
ओजस्वी फेट्याखाली शब्दसंभार लपवून
एक झाली होती आवेशपूर्ण पोवाडा,
दुसरी, अनुप्रास यमकांच्या शब्दाबाहेर नसलेली
सासुरवाशीण नवोढा
तिच्या समवेत एक पोक्त काव्यपुरंध्री— शालीन, काठपदराच्या साडीतली.

हिरव्यागार मोरपिशी पेहेरावातली सुस्वरुप एक निसर्गकविता,
आणि पिसागत तरंगणारी, भिरभिरत्या नजरेची ती प्रणयकविता.
एक घाईघाईत आलेली, थोडीशी विस्कटलेली शीघ्रकविता.

तडफदार कदमतालाचं लेणं मिरवित होती एक  समरगीता.
तिच्या बरोबर आली नाट्यपदांनी शृंगारलेली एक अक्षर संगीतिका.

डोळे मोडित ठुमकत एक लावणी आलेली ,
एका बेसावध क्षणी अभंगाला भुललेली.

कुणीतरी बळेच ओढून आणलेली एक विराणी, खिन्नवदना.
आणि सगळेच वचकून होते जिला, अशी एक विडंबना.

अर्ध्या दळणावरून उठून आलेली,
रुपेरी केसांची एक सात्त्विक ओवी,
सोबतीला, काठी टेकीत उतरलेली
जख्ख म्हातारी आर्या– अभिजात, अनुभवी.

भरजरी शालूतलं, उच्चकुलोत्पन्न
अतिविशाल एक महाकाव्य प्रसन्न
अवजड गतवैभवखुणा सांभाळत,
उतरलं आपल्या युवा पिढीसोबत.

भावुक डोळ्यांची, जोडीला आली
एक चारोळी, परकर पोलक्यातली.
तिचं बोट धरून होती ,  इवलाली
बडबडगीता, झबलं-टोपड्यातली.

अशी जमवाजमव होइतो, चांगलीच रात्र झाली,
वेळ टळून गेली झोपेची, भूपाळी पेंगुळली.

शांत संयत अंगाई जागे ,
टक्क उघड्या डोळ्यांची
रोजचीच तिला सवय,
सगळ्यांना झोपवून मग निजायची!

नाच-गाणी संगीत वादन, त्या ठेक्यावर फेर धरून 
सारयाच दमल्या,  भोंडला रात्रभर जागवून .

यथावकाश, पूर्वरंग उधळत
दिनकराची प्रभातफेरी सुरु झाली,
तेव्हा कुठे राष्ट्रगीताने
कार्यक्रमाची सांगता झाली !

मी

08 10 2007

मी शोधतोय माझ्यातल्या नेहेमीच्या ‘मी’ला
माझ्या सवयीच्या,रोजच्या ‘मी’ला

हा कोण नवीनच मी
‘मी मी’ म्हणत पुढे येतोय?

असे आहेत अनेक मी माझ्यात.
प्रत्येकात आहेच मी थोडा थोडासा,
तरी या सर्वाना पचवून मी उरतोच बराचसा.

एक मी झालेला नकोसा
पण,बसलेला ठाण मांडून.
दुसरा मी हवाहवासा
बघेना माझ्याकडे ढुंकून…

एका ‘मी’ला माझं अप्रूप
तर दुसरयाला मीच झालोय नकोसा !
एक मी, अभिमान वाटण्याजोगा
अन्य मी लपवून ठेवावासा….