Archive for the ‘मराठी कविता’ Category

नवशिका

01 04 2008

सर्वांनाच हे सत्य असतं माहित,शिकणं आयुष्यात पहिलं गृहित
अनुभवाच्या पुस्तकातून शिकत, लिहून घ्यायचं कोर्‍या वहीत
इथे टिकणं म्हणजे शिकणं आलं, नवशिक्याचं दुखणं आलं
सुरुवातीचं चुकणं आलं , अपमान गिळून वाकणं आलं
नवागताचं थरथरणं आलं,जाणत्याची बोलणी खाणं आलं
आपल्याच नजरेतून उतरणं आलं,गुरुचं मन राखणं आलं..

आपण सगळेच ह्यातून जातो,कसोटीचा तो काळ विसरतो,
हळूहळू नवीन नवख्याला, आपल्याही नकळत ऐकवू लागतो-
“आम्हाला हवाय माणूस अनुभवी,नवशिक्याची कटकट कुणी घ्यावी?
अहो,उमेदवारी अवश्य करावी पण..गैरसोय कुणी सहन करावी ? ”
आजवर असा एकच झाला,आईच्या पोटात शिकून आला
चक्रव्यूहात शिरुन उरलेला,धडा शिकून निघून जायला…
बाकी तुम्हां-आम्हांला, इथे येऊनच शिकायचं-शिकवायचं
आपलं शिकणंही सहन केलं होतं कुणीतरी ,कधीतरी–

…..हे मात्र ध्यानात ठेवायचं !

सौंदर्य

10 03 2008
मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात तू रोजच दिसतोस
मी भेटले की, संभ्रमात, अवघडलेलं हसतोस.

माझी हुशारी, बोलणं-वागणं   तुला भावलेलं दिसतंय,
त्याचं कौतुक तुझ्या डोळ्यांत तुझ्या नकळत हसतंय !

पण.....मी दिसायला सामान्य आणि मलाही आहे मान्य
सर्वमान्य हे सत्य, की सौंदर्य तेच, जे डोळ्यांना दिसतं !

माझ्यातली ती अदृष्य सुंदरी जी तुला खुणावतेय ना,
तिच्या दृष्य रुपातली उणीव तुला अस्वस्थ करतेय, ना ?

असल्या नकारांची आताशा सवय होऊ लागलीय मला,
खरंच, पण असं का व्हावं कधीच कळणार नाही मला !

आतून आपल्या सौंदर्याला नित्य उधाण येत रहावं,
अन किनार्‍यावरच्या जगाच्या..... ते गावीही नसावं ?

कधीतरी वाटून जातं - भरतीच्या समुद्रासारखं, वहावं
ते ओसंडून बाहेर , अन अलगद सर्वांगावर पसरावं...

फार नाही, निदान इतपत तरी, की कधीतरी,
...... तुझ्यासुद्धा डोळ्यांना ते दिसावं !

तो आणि ती

22 02 2008

ती तिच्या सख्यांची लाडकी
तोही आपल्या वर्तुळात लोकप्रिय

तो हळुवारशा कविता करतो,
मैफिली दोस्तांच्या गाजवतो.
तिचाही गळा म्हणे गोड आहे,
भावगीतांचं तिला वेड आहे.

तो आहे अभिजात रसिक,
मोठ्या मनाचा, विचारी…. अन बरंच काही
तिची विशेषणं – मनमिळाऊ, समजूतदार
शांत, करारी….. अन असंच काही
…….
तो वक्तशीर, व्यवस्थित
ती टापटिपीची, नियमित
कार्यालयं नेटकी त्यांची,
मात्र घडी विस्कटलीय प्रपंचाची..
……..
छान-छान सगळं घराबाहेर….
ते जिथे येतात एकत्र
त्या घरात मात्र, दिवस-रात्र
रुक्ष, गद्य नूर खेळाचा,
देता-घेता घरचे अहेर
हरवलाय सूर वाद्यमेळाचा
त्याचा झालाय कप तुटक्या कानाचा,
तिच्या संसाराच्या भांड्याला आलाय पोचा..
……..

आपापल्या भ्रमणकक्षेत, चारचौघांत
दोघे  फिरतात एकाच परिघांत
आणि ह्या एकेकाळच्या  अनुरुप दोघांत
एक इवलासा दुवा, कावराबावरा,  टकमक पहात..

त्याच्या बाजूने निघून जातात
वाटोळं झालेल्या घरच्या त्रिकोणात
दोन समांतर रेषा दोघांच्या ,
एकमेकांना त्या कधी भेटायच्या ?

धर-सोड

19 02 2008

धर-सोड बरी नाही म्हणतात,
आयुष्यभर तरीही सगळे
धर-सोडच तर करत असतात !
हवंहवंसं ते धरु पहातात,
नकोसं झालेलं सोडत रहातात…

भेटत असतात रोज असंख्य
माणसं,विचार, अनुभव, प्रसंग
सोडू काय ,धरु  कुणाचा संग
धरसोडीचा  नित्य नवा रंग !

काय, कसं, किती वेळ धरावं
घट्ट पकडावं का अधर धरावं ?
कधी नाद सोडून मागे फिरावं,
कशाच्या आशेने पुढे सरावं…

धरु पाहिलेलं निसटत रहातं,
सोडलेलं वारंवार भेटत रहातं
ह्या धरसोडीला धरुनच वहातं
जीवनातलं पाणी आटत रहातं.

आपण काहीतरी सोडूनच इथे येतो
उरात भरलेला पहिला श्वास धरुन
त्याचीच धर-सोड करत रहातो,
ठरल्या वेळेपर्यंत– धीर धरुन.

आधी सोडू म्हटलं, सोडवत नाही
वेळेला धरु म्हटलं, धरवत नाही !

ह्या धरसोडीला आयुष्य पुरत नाही,
नंतर मात्र, सोडून द्यायला
धरसोड सुद्धा उरत नाही…..

शहर

04 02 2008

तो घुसला होता थेट घरात, दिलखुलास हसत
येउन गेलं होतं मनात,हा इथला नाही  दिसत !

मनमुराद बोलणं अन आरश्यासारखं जगणं
कसं खपावं इथल्यांना, त्याचं वेड्यासारखं वागणं !

न संकोच ना भीती, ना परिणामाची क्षिती
म्हटलं शिकेल अनुभवांती, इथल्या चाली-रिती.

आली होती त्याला बघून, विसरलेली आठवण
नव्हतो का एकेकाळी, अगदी असेच आपण….
………………
बर्‍याच दिवसांनी भेटला, खूपच आता बदललाय
झुकलेला, विझलेला, आम्हां सगळ्यांसारखा झालाय

थोडं-फार वाईटही वाटलं, म्हटलं ह्याचंही असं व्हावं ?
नक्की समजेनासं झालं; आपल्याला हेच होतं ना हवं ?
…………………
त्याचं वेगळेपणाचं वेड आज पुन्हा आठवलंय
त्या वेडाचं वेगळेपण, आत कुठेतरी साठवलंय

त्याला एकदा भेटून, हे सांगायचं राहून गेलंय
दरम्यान पुलाखालून  बरंच पाणी वाहून गेलंय….
………………….

आज ऐकलं तो म्हणे शहर सोडून निघतोय
त्याच्या जागी इथे, बघू नवीन कोण येतोय !

सून

28 01 2008

परवा हे रात्री बोलून गेले
कधी नव्हे ते गोड-गोड हसत,

“आपल्याला सून हवी तुझ्यासारखी–
अगदी समजूतदार, शांत ! ”

बोलून ते झोपून गेले,
अन घोरायलाही लागले.

मी  आपली गप्प, त्यांच्याकडे बघत
आतला आनंद सरावानं लपवत..
‘उशीरा का होईना.. !’ म्हणत,
नकळत होते स्वतःशीच हुरळत.

पण…बराच वेळ जागल्यावर
आले  सवयीनं भानावर
विचार केला बोलण्यावर
म्हटलं घ्यावं का ते मनावर ?

खरंच का ह्यांना आवडलंय,
आपलं आजवरचं वागणं
का ह्यांना अजून एक हवंय
बिनआवाजाचं खेळणं ?

मुलगा आपल्या दोघांचा,
आहे म्हणायला मातृमुखी
बाकी वळणावर त्यांच्या,
सारी लक्षणं सारखी..

बाप-लेकांचे शब्द झेलणं
झालंय मला नेहेमीचं,
काम नाहिये पण हे
नवख्या पोरी-सोरीचं.

दुसर्‍याची लेक, आशेनं
आपल्याघरी येईल
माझं झालं ते झालं,
पण तिचं काय होईल ?

गीत माझे

11 11 2007

पाहिले मी तुला अन् शब्द ओठी धावले
साज चढवाया तयांना सूर तेही लावले
गाईलेले गीत माझे ते तुलाही भावले
बोल लावाया मला ‍परि जगाचे फावले.

यावया कक्षात तुझिया घोटाळती ही पावले
शृंखलांनी बद्ध ह्या,तरि बाहु मी फैलावले
असमर्थ,असहाय्य मी जरि बंध हे सैलावले
नयनद्वारि थकुन माझे अश्रुही विसावले.

हेच अंती पाहण्या का स्वप्न होते दाविले ?
जीवघेणे घाव देऊन अन् मला नादाविले ?

मान्य की हे वेड माझे मीच मजला लाविले,
सार्थकी त्यानेच पण आयुष्य माझे लाविले…..

आपलं गाणं

11 11 2007

पिकतं तिथे विकत नसतं , खरंय.
पण म्हणून…….
पिकवणं कुठे थांबत असतं !

ऐकणारं कुणी नाही म्हणून ..
संभाषणही संपवायचं नसतं.

साथीला कुणी नसलं तरी
चालणं थांबवून चालत नसतं,

जगाशी पटलं नाही म्हणून
जसं, जगणं संपत नसतं.

वाचायला कुणी नसलं तरी
लिहिण्याचं वेड वाचवायचं असतं.

‘ मग हे सगळं का करायचं?’
विचारत बसायचं  नसतं–

अंतर्नादाच्या साक्षीनं,
आपलं गाणं गायचं असतं !

कालचक्र

10 11 2007

कोवळी सूर्यकिरणं लेवून
पहाट तळ्यावर अलगद येते
पाण्यात प्रतिबिंब पाहून
स्वतःशीच मोहरते..
सोनेरी बटांनी वेडावलेल्या
पक्षिणीचं गाणं ऐकून हरखते
हिरवळीत, दवातून
आरक्तगाली हसते,
मान वेळावून कमलिनी
पहाटेकडे पहातच रहाते.

पूर्णसूर्य भाळी घेउन माध्यान्ही,
दुपार येऊन थडकते,
कडेवरून झेपावणारं
बिंब पाण्यात न्याहाळते.
काठावर त्याला सोडून
फुलाबाळांत रमवते
घनदाट काळ्याभोर छायेत
सूर्यासोबत रेंगाळते,
अन् उन्हासावल्यांशी खेळून
दमून झाडाशी विसावते.

सूर्याला मार्गस्थ करून,
तळ्याशी संध्याकाळ अवतरते.
झोपाळलेल्या भुरकट सावल्यांना,

थोपटून निजवते
दिवसभर उंडारलेल्या फुलापाखरांना
दामटून घरट्याची ओढ लावते,
उगवत्या तार्‍याच्या मदतीनं
पुढचे वेध घेऊ लागते,
चिडीचुप झालं की झाकपाक करुन
तळ्याकाठीच मुटकुळं होते.

यथावकाश टिपूर केसांची ती
पुनवेची रात्र तळ्यावर पोहोचते.
इकडचा तिकडचा कानोसा घेत
ती चांदण्यांना बोलावणं करते
वाटोळं चंद्रमुख तळ्यात बघत
काठाने येरझारा घालत रहाते
दमल्यावर मग गार पाण्यात
ऐसपैस पाय सोडून बसते.

पण आता घटिका भरत आलेली असते–

मग बळेबळेच उठून
पहाटगर्भ सांभाळत
जड पायांनी रात्र ,
रामप्रहरीच हळूहळू चालू लागते…..

********************************

यात्रा ( हिन्दी रूपांतर )

—-

दबे पाँव तालाबपर सुबह आती है,
कच्ची धूपकी चुनर ओढे
जलमें अपनी प्रतिमा देख
मनही मन लज्जित हो उठती है
सुनहरी घुंगराली लटोंसे पगलाई
पक्षिणीके गीतसे ललचाती है
ओसबिंदुओंमें, हरियालीसंग
आरक्त कपोलोंमें मुस्कुराती है
कमलिनी अपनी ग्रीवा ताने
सुबहसे ताँक-झाँक करती है !

मध्यान्ह-समय ललाटपर दिनमणि धरे
दोपहर उस तालपर आ धमकती है
गोदीसे स्वतन्त्र होनेको आतुर
शिशुबिम्बको जलदर्पण दिखलाती,
तालाबतटपर उसे छोड फूलों-कलियोंमें रिझाती है
घनी छायामें संग दिनकरके टहलकर,
धूप्-छाँवसे आँख-मिचौली खेल
थकी-हारी पेड तले लेट जाती है.

यथाकाल सूर्यको नियत पथपर बिदा कर
सन्ध्या तालके किनारे आती है
नीन्दसे भारी पलकोंकी साँवली छायाओंको
सहलाकर सुलाती है
दिनभर चहकते, फुदकते पक्षियोंको
जबरन अपने-अपने घोंसलोंकी चाह दिलाती है,
उगते सितारेकी दिशाको देख
भविष्यका ताल-मेल मिलाती, और सन्नाटा छातेही
वहीं धराशायी हो लेती है.

खामोशीमें घुली, चाँदनीमें धुली,
पूर्णचंद्रमासे खिली पूनमकी रात
यथाकाल तालाबपर उपस्थित हो जाती है
रुपहले केशोंमें सितारे संजोकर
किनारेकी सैर करती, तालाबमें
चंद्रमुख निहारती है
सहसा विश्राम करने हेतु
तालके पानीमें पैरोंको भीगोने बैठ जाती है

परंतु अब बेला आन पडी होती है —

फिर रात, जैसे-तैसे जतनसे खुदको जुटाकर॑
उदरके प्रभातगर्भको सम्हाले,भारी पैरोंसे,
उजियालेकी ओर बढती

तडके एक नये दिनकी यात्रा आरंभ करती है…..

********************************************

दीपोत्सव

08 11 2007

उत्साह ऊर्जा उत्सव

मांगल्य आणि वैभव

उन्नति उद्धार गौरव

सौन्दर्य तेज सौष्ठव

शांत संयत मार्दव

भावनांचा गुंजारव

नेत्रदीपक, अद्भुत भाव

वार्षिक, तरी अभिनव

एवंगुणविशिष्ठ अनुभव

एकमेव, दीपोत्सव !

******************

प्रारंभी मंगलाचरण

करु श्रीगणेशस्तवन

आणि श्रीसद्गुरुआराधन

मग कुलदेवतावंदन

पश्चात् ईष्टदैवतनमन

पूर्वजपुण्यस्मरण करुन,

आरंभू दिवाळसण !

सर्वां स्फुरण प्रोत्साहन

रंगावलि कंदिलतोरण

सुगंधित पखरण

पुष्पमाला पूजार्चन

दीपमाला विभुतिचर्चन

ईष्टमित्रां आमंत्रण

परस्परां नम्राभिवादन

आप्त स्नेही संमेलन

वरिष्ठ अभीष्टचिंतन 

मंगल शुभाशीर्वचन

मधुर स्वाद भोजन

संगीत मंजुळ गायन

वादन नर्तन जनरंजन

बहुरंगी प्रकाशयोजन

हर्षोल्हासित बहु जन

सर्वप्रिय, दिवाळसण !