Archive for the ‘मराठी कविता’ Category

देवाण-घेवाण

22 02 2009

तो सार्‍यांना काही न काही देत असतो
आपण काही मिळालं नाही, म्हणत रडत असतो
मिळालेलं वापरत नसतो,
न मिळालेलं विसरत नसतो
पुरेसं मिळालं नाही म्हणत कुढत बसतो
दुसर्‍याला जास्त मिळालं की चडफडत असतो
‘मला पुरे’ म्हणणारा इथे एखादाच दिसतो
देताना तो आपला, घेताना कुणीच नसतो

तो वरुन सारं बघत मजेत हसतो…
कधी तो घेतलेलं परत देत असतो,
कधी परत घेण्यासाठीच देत असतो

आपण माणसंही आपसात देत-घेत असतो
मिळालेलं गृहित, दिल्याचा मात्र हिशेब असतो
देवाण-घेवाण संपेतो आपण इथेच रुळतो,
कार्यभाग उरकला, की गाशा गुंडाळतो

आपल्याला परत घ्यायला तो बसलेलाच असतो,
त्याचा व्यवहार अव्याहत चाललेलाच असतो…

पुढचा निर्णय

01 02 2009

परवाच मला भेटला- खजिल, खांदे झुकलेला
माझाच एक ताजा निर्णय- साफ चुकलेला
एकटेपणाची भावना दुखवत होती त्याला-

मी म्हटलं, तू नाहीस माझा पहिला-
नक्कीच नसशील शेवटचाही,
असा नेम हुकलेला!

घेऊन गेलो त्याला
भूतकाळाच्या तळघरात,
चुकल्यामाकल्यांची  वरात
तिथे पाहून तो दचकला-
अहोरात्र पेटलेल्या अहंकाराच्या धुनीभोवती
दबक्या आवाजात बोलत बसलेले,
त्याला दिसले बरेच अंदाज-आडाखे
त्याच्यासारखेच फसलेले

उजळ माथ्यांचेही होते थोडे
चुकून अचूक ठरलेले,
आणि वेळ टळल्यावर घेतलेले
काही सावधपणे बेतलेले

माझ्याकडे शेवटचं एकदा बघून,
तो त्यांच्यात मिसळला,
बघता-बघता इतिहासजमा झाला..

हात झटकून मीही निघालो,
थांबायला वेळ कुठे होता?
माझी वाट पाहत खोळंबलेला
पुढचा निर्णय घ्यायचा होता !

गझलेस मनोभावे

18 01 2009

कोणा कसे कळावे की काय साहिले मी
गझलेस मनोभावे आळवुन पाहिले मी ॥ धृ ॥

ते ‘छंद’ पोसताना निघते असे दिवाळे
‘गागाल गाल’  गाता की गालगुंड झाले
तोंडास फेस माझ्या कोणास ना कळाले
वृतात मी लिहीले ह्याचेच वृत्त झाले !

वेडात काय गोडी चाखून पाहिले मी ॥१॥

वस्तीत रदीफांच्या काफिले काफियांचे
मिसरे, अलामतीचे ते दाखले तयांचे
मक्त्यास हा उतारा-  हे स्थान ‘मातल्यां’चे
जमिनी मशागतीचे कुळकायदे युगांचे !

हे काम जोखमीचे, परि शांत साहिले मी ॥२॥

उत्तरार्ध

01 11 2008

( पूर्वसूत्र :  ‘पूर्वार्ध’ )

….आत्ता कुठे सुरु झाला होता,
त्यांच्यातल्या नात्याचा प्रवास, उत्तरार्धाकडे!
——————————

कंबर कसून ते नातं आता कामाला लागलं,
कधी हादरलेल्या त्याला
किंवा भेदरलेल्या तिला
दोघांना चुचकारत -प्रसंगी फटकारत,
खाचखळगे,नागमोडी वळणं धीरानं पार करत
दोन्ही चाकांना मार्गावर ठेवत…

पण लवकरच पुन्हा एकदा दोघांना भासू लागलं, की
स्वेच्छेने कडेवर घेतलेलं
ते नातं होतं मानेवरचं असह्य जोखड!

फारकतीच्या सुरांना बरकत येऊ लागली..
आणि खांद्यावरचं जू उतरवून
स्वतंत्र वाटा शोधण्यासाठी
सुरु झाल्या त्यांच्या सशस्त्र वाटाघाटी !

हतबल त्राग्यातून,दोषारोपांच्या फैरींतून
अटळ आत्ममंथन होऊ लागलं, तेव्हा सामोरं आलं
कल्पिताहून अद्भुत एक उघड गुपित-

दोघांतलं नातं असं काही वेगळं नसतंच,
असतो केवळ प्रत्येकाचा दोन रुपांतला एकत्र प्रवास, आत्मशोधाचा !

आपल्या भविष्याआड येऊ पहाणार्‍या नात्याला
दूर सारुन त्यांनी पाहिलं,तर दूरवर काहीच दिसेना..

आत्मबोधाच्या क्षणी कलह कसा संपला, आणि ते नातं
त्यांच्यात कधी विरघळून गेलं, त्यांना कळलंही नाही…

आपलं इथलं काम संपवून नातं निघालं,
पुन्हा एका नवीन प्रवासाला-
——————————-
…सार्‍या नजरा चुकवत
त्या दोघांची पहिली डोळाभेट झाली तेव्हा….

पूर्वार्ध

31 10 2008

सार्‍या नजरा चुकवत
त्या दोघांची पहिली डोळाभेट झाली
तेव्हा, त्यांच्याशिवाय एकांतात तिथे
त्यांच्याही नकळत आणखी कुणीतरी होतं,
हळूहळू आकार घेऊ पाहणारं,
दोन जिवांतलं नवजात नातं…..
त्यांना माहीत नव्हतं, पण-
त्यांच्यामधल्या अदॄश्य सेतूवर हुंदडत
त्यांच्याकडे निरागस अपेक्षेने बघत,
त्यांना अनावरपणे एकमेकांकडे ओढत….
प्रत्येक भेटीत, पुढच्या मीलनाची ओढ लावत,
ते क्षणागणिक बाळसं धरू लागलं होतं….
…..
यथावकाश ते वयात आलं, आणि दोघांनी
एक दिवस त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं,
तेव्हा ते नातं अमाप सुखावलं,
दोघांच्या गळ्यात पडून, क्षणभर विसावलं.
त्या दोघांना कवेत घेऊन, हवेत तरंगू लागलं
त्याचा दरवळ सुदूर पसरला..
तिच्या लाडक्या हिरव्या चाफ्यासारखा, स्वप्नवत्.
….
दरम्यान, अव्याहतपणे –
वास्तवातल्या दिवसांचे आठवडे होत होते, महिन्यांची वर्षं
ते नातं नुकतं कुठे स्थिरावत होतं, आणि एका गाफिल दिवशी..
शब्दांवर शब्द आदळून तो तिच्यावर रागावून ओरडला,
तेव्हा ते केवढ्यांदातरी दचकलं-
त्यांना एकटं सोडून कोपर्‍यात एकटं थरथरत उभं राहिलं..

अनुत्तरित प्रश्नांच्या, गैरसमज-मतभेदांच्या वावटळीत सापडलेली
ती दोघंही भिरभिरत राहिली, बराच काळ.

वादळानंतरच्या शांततेत दिलजमाईची एक गार झुळूक दबकत आली,
तेव्हा कुठे त्या नात्यावरचा ताण सैलावला
आणि मनाशी काही ठरवून ते निर्धाराने पुढे सरलं.
नवीन जबाबदारीची जाणीव होऊन ते आता
अकाली पोक्तपणाने, त्यांना हाकारु लागलं…
…..
आत्ता कुठे सुरू झाला होता,
त्यांच्यातल्या नात्याचा अधिकॄत प्रवास, उत्तरार्धाकडे !

पहिली दिवाळी

28 10 2008

दीपमालिका चहुकडोनी झगमगते दारात चांदणी
भल्या पहाटे सडा घालुनी रंगावलि काढून अंगणी

गर्भरेशमी वस्त्र लेउनी निरांजने ती घेउन हाती
कुंदकळ्यांची प्रभा पसरली खळी खुले आरक्त प्रभाती

कुंकुम भाळी मेंदी हाती, किती वागवी अहेवलेणी
कंकण हाती पायी जोडवी नथ नाकी अन् कुंडल कानी

कटाक्ष भोळे भिरभिर डोळे कष्टाने बहु आवरते ती
क्षणात हसते, बावरतेही पुन्हा धिराने सावरते ती

नाव घेउनी चूर लाजुनी भावसागरा येते भरती
स्वतः भोवती घेते गिरकी चुकार बट ती गालावरती

किणकिण हासत पैंजण वाजत अंगणात साजते नव्हाळी
दीप नाचती सलज्ज नयनी ही पहिली गाजते दिवाळी !

उदे उदे उदे उदे

06 10 2008

उदे उदे उदे उदे उदे उदे हो ॥ धृ॥

नवरातीची चाहुल , घट मांडू पानं फुलं
ठेक्यात उठे पाउल, मन तालावरती डुलं
गोंधळास पातली, माझी रेणुकामाउली  ॥१॥

माहूरगडी बैसली, माझी मायेची सावली
रेणुकामाउली गं, रेणुकामाउली
उदे उदे उदे उदे उदे उदे हो ॥ धृ॥

पोर नाचे आईपुढं, घालितो तिला साकडं
घाईत वेडवाकडं, तूच पाही माझ्याकडं
तुळ्जापुरवासिनी भवानी, आई जगदंबा ही ॥२॥

तुळ्जाई भवानी, माय तुळ्जाई भवानी
तुळजापुरवासिनी गं , तुळजापुरी भवानी
उदे उदे उदे उदे उदे उदे हो ॥ धृ॥

वाजवी भक्त संबळ, काळजामधी खळबळ
वाहे डोळा पाणी गळं,भक्तिभावाचा दर्वळ
करविरातली अंबाबाई, महालक्षुमी आई ॥३॥

उदे गं अंबाबाई, माझी आई लक्षुंबाई
कोल्हापुरवासिनी गं,उदे गं अंबाबाई
उदे उदे उदे उदे उदे उदे हो ॥ धृ॥

सांडिला पुरा अभिमान,हरपुनी गेलं देहभान
पायांत लागलं ध्यान,डोळ्यांत आणुनी प्राण
नाशिकातली वणी पाहिली ,सप्तशॄंगी आई ॥४॥

नाशिकात सप्तशॄंगी, माउली वणीची देवी
सप्तशॄंगवासिनी गं ,भक्ताची पर्वणी
उदे उदे उदे उदे उदे उदे हो ॥ धृ॥

क्षण हा

02 10 2008

दारी उभी तू क्षण हा थांबलेला
नि:शब्द मीही,गळा दाटलेला
ह्या घडीला मूक राहूत दोघे
बोलू देऊत फक्त ह्या क्षणाला

अव्याहत रांगेत त्या क्षणांच्या
संशय,भयाच्या वादळी रणांच्या
गर्दीत तो उभा होता धिराने
साहून बेड्या पायी मणांच्या

प्रश्नकाहूर ते पळभरी असू दे
मुक्त आसवे ही गाली गळू दे
उतरवू दागिने वेदनेचे क्षणैक
सुख मीलनाचे क्षणाला मिळू दे

ओठांकिनारी अश्रूंत वहाते
स्मितनौका,हेलकावे पहा ते
असो दुरावे,डोळ्यांतच भेटू
म्हणेल क्षण ‘अहा,प्रेमी पहा ते!’

आले गणराय

09 09 2008

येता गणेशाचा सण, जन जाती हरखुन
जुनंपानं विसरुन, नवं कौतुक लेऊन

घरा येता गणराय,काय सांगू थाटमाट
पाट रांगोळी आरास, पुढे मोदकांचे ताट

पुढे येतसे गौराई, ठाई ठाई रोषणाई
आई तीन दिवसांत,घरी निघुनिया जाई

येता अकरावा दिन, गणपति विसर्जन
बोळवण भावभरे, साठवण आठवण

गजानन मनी धरु, करु भजन आरती
किती आवरा मनास,येते डोळ्यांत भरती !

********************************************

आले आले गणराय, घरी अकरा दिवस
वर्षाकाठी एकदाच, अम्हां त्यांचा सहवास

आले वाजत गाजत, घरा आले गजानन
रुप साजिरं बघून, फिटे डोळ्याचं पारणं

आले आले गणराय, मागोमाग येई गौरी
तीन दिवस उत्सव ,थाट-माट घरोघरी

आले आले गणराय, करु भजन आरती
गोड नाम घेता घेता, कसे दिवस सरती

यथाकाल बोळवण,कधी येऊ नये वाटे
भक्त नाचे देवापुढे,पण डोळा पूर दाटे !

मोरपीस

21 08 2008

तो तसा दिसायला सामान्यच,
दोघांच्या गर्दीतही हरवून जाणारा
चालणं-बोलणं अडखळत त्याचं,
एकूण अस्तित्त्वच अवघडलेलं.
दिवसात एकदा हसला तरी पुरे,
आयुष्यात रंग उरलेत फक्त करडे-भुरे…
…..
पण तरीही तो आहे जरा निराळाच,
अस्तित्त्वाच्या मंथनात, कोलाहलाच्या हलाहलासोबतच
त्याला गवसलाय एक अमृतकुंभ… प्रतिभेचा !
…..
मधूनच कुठुनशी एक हलकी साद येते
फक्त त्यालाच ऐकू येणारी-
मग त्याच्या वावरण्यात येते,
एक निर्भय सफाई, लगबग
न शोभणारा अधीरपणा….आणि
तो उघडतो मनातलं ते दालन…
आतलं लखलखतं मोरपीस त्याला खुणावतं
ते मस्तकी खोवुन, तो बनतो कुणीतरी वेगळाच !

हाहा म्हणता तो मग रचतो शब्दांचे मनोरे,
लीलया उभारतो भावनांची भन्नाट वादळं,
प्रतिभेच्या कुंचल्यानं चितारतो
अभिव्यक्तिचं वेलबुट्टीदार इंद्रधनुष्य…
स्वतःशीच गुणगुणत,उन्मत्त डोळ्यांनी
तो नजर दौडवतो आपल्या प्रतिसृष्टीवर, आणि-
सृजनाच्या शतधारांत चिंब होऊन त्याच्या
मनातला मोर थुईथुई भिरभिरत रहातो..
…..
यथावकाश सारं पहिल्यासारखं होतं,
बरसून गेलेल्या पावसाचा मागमूसही
त्याच्या चेहेर्‍यावरुन पुसून जातो
पण मनातलं ते मोरपीस मात्र
खट्याळपणे हसत रहातं,
त्यालाच ऐकू जाईल, अश्या बेतानं !