सुचले नाही

{मायबोली.कॉम येथील गझल कार्यशाळेकरिता पाठवलेली ‘लगा लगागा लगागालगा ललगा गागा’ ह्या वॄत्तातली  ‘रचले नाही’ ही पहिली गझल अलामत आणि एकूणच तंत्र न जमल्यामुळे नव्याने लिहिली व सुधारित रचना ‘सुचले नाही’ तेथेच प्रथम प्रकाशित केली.}
********************************************************************************************************

रचले नाही
…………

उभे रहावे किनार्‍यावरी सुचले नाही
वहात जावे प्रवाहासवे,सुचले नाही

गुपीत होते विश्वासावर उघडे केले
जनांत सारे तुझे सांगणे रुचले नाही

जगात सारे कसे चालते बघता मीही
चुकून खोटे कधी वागलो-पचले नाही

तिचे बहाणे,तिचे वागणे हॄदया माझ्या
कळून चुकले, तरी बापडे खचले नाही

उगाच वाटे जरा बोलुनी हलके होऊ
उगाच की हे कुणी गावया रचले नाही
*******************************

सुचले नाही
…………

जमाव जातो कुठे, पाहुया- सुचले नाही
प्रवाहासवे पुढे जाउया-  सुचले नाही

मनाकडे मी कितीकदा कुजबुजलो होतो
तुलाच सारे कधी सांगुया- सुचले नाही

जगावे कसे सांगाया ते अधीर होते
कुणास येथे गुरु मानुया-सुचले नाही

नमस्कारही कराया मला जमले होते
चमत्कार मागून पाहुया-सुचले नाही

लवाद आणि निवाड्यात मी थकून गेलो
कधी पुरावे तरी मागुया -सुचले नाही

तिचे उखाणे, तिचे वागणे छळून गेले
नवाच कोणी हात शोधुया-सुचले नाही

मला कळेना कुणा बोलुनी हलका होऊ
सुरात हे रडगान गाउया- सुचले नाही

2 प्रतिसाद to “सुचले नाही”

  1. Kaushal S. Inamdar's avatar kaushal s. inamdar Says:

    दोन्ही गझला अप्रतीम झालेल्या आहेत. मीटर मध्ये लिहिलेलं पाहून आनंद झाला. बरेच ‘वीक कवी’ किलोमीटरमध्ये लिहितात!

  2. वाचून बघा's avatar वाचून बघा Says:

    मन:पूर्वक धन्यवाद , ‘वीक कवी’ आणि ‘किलोमीटर ‘ मस्तच !

यावर आपले मत नोंदवा