गीत उरावे

सांगावे हे गुज वाटावे
अधिर ऐकण्या ते भेटावे
शब्द लाजरे हळु रेटावे
अंतर मौनातले फिटावे
सांगायास विलंब न व्हावा
ऐकल्यावरी धीर रहावा
मायेला आरसा मिळावा
छायेतच कवडसा मिळावा
मीलनक्षण असा खुलावा
एक कटाक्षी जीव भुलावा
गुलाब गालांवरी फुलावा
हर्षभराने देह झुलावा
मंद गंध शब्दांना यावा
लज्जेचा निर्बंध गळावा
स्पर्शांतुन नव अर्थ रुजावा
आवेग मनीचा व्यर्थ न जावा
शब्दांचे मग काम सरावे
काय सांगणे ते विसरावे
मिटोनिया सारेच दुरावे
मधुर एक ते गीत उरावे !

4 प्रतिसाद to “गीत उरावे”

  1. shrikrishnasamant's avatar shrikrishnasamant Says:

    सर्वच कविता सुंदर आहे पण मला आवडले ते हे कडवे

    “शब्दांचे मग काम सरावे
    काय सांगणे ते विसरावे
    मिटोनिया सारेच दुरावे
    मधुर एक ते गीत उरावे !”

    आपल्या कविता मी नेहमीच वाचतो.
    सामंत

  2. वाचून बघा's avatar वाचून बघा Says:

    आभार, सामंत साहेब !

  3. prasanna's avatar prasanna Says:

    mazya nava pramane vachun parasanna jalo……….
    kharokhar manala bhavanari……..

  4. वाचून बघा's avatar वाचून बघा Says:

    प्रसन्ना, अभिप्रायाबद्दल आभारी आहे !

यावर आपले मत नोंदवा