Archive for the ‘मराठी गझल’ Category

सुचले नाही

22 10 2008

{मायबोली.कॉम येथील गझल कार्यशाळेकरिता पाठवलेली ‘लगा लगागा लगागालगा ललगा गागा’ ह्या वॄत्तातली  ‘रचले नाही’ ही पहिली गझल अलामत आणि एकूणच तंत्र न जमल्यामुळे नव्याने लिहिली व सुधारित रचना ‘सुचले नाही’ तेथेच प्रथम प्रकाशित केली.}
********************************************************************************************************

रचले नाही
…………

उभे रहावे किनार्‍यावरी सुचले नाही
वहात जावे प्रवाहासवे,सुचले नाही

गुपीत होते विश्वासावर उघडे केले
जनांत सारे तुझे सांगणे रुचले नाही

जगात सारे कसे चालते बघता मीही
चुकून खोटे कधी वागलो-पचले नाही

तिचे बहाणे,तिचे वागणे हॄदया माझ्या
कळून चुकले, तरी बापडे खचले नाही

उगाच वाटे जरा बोलुनी हलके होऊ
उगाच की हे कुणी गावया रचले नाही
*******************************

सुचले नाही
…………

जमाव जातो कुठे, पाहुया- सुचले नाही
प्रवाहासवे पुढे जाउया-  सुचले नाही

मनाकडे मी कितीकदा कुजबुजलो होतो
तुलाच सारे कधी सांगुया- सुचले नाही

जगावे कसे सांगाया ते अधीर होते
कुणास येथे गुरु मानुया-सुचले नाही

नमस्कारही कराया मला जमले होते
चमत्कार मागून पाहुया-सुचले नाही

लवाद आणि निवाड्यात मी थकून गेलो
कधी पुरावे तरी मागुया -सुचले नाही

तिचे उखाणे, तिचे वागणे छळून गेले
नवाच कोणी हात शोधुया-सुचले नाही

मला कळेना कुणा बोलुनी हलका होऊ
सुरात हे रडगान गाउया- सुचले नाही

कालचेच होते

25 09 2008

माझ्या पराभवाचे ते दाखलेच होते
सोडून हात गेले ते आपलेच होते

झाल्या चुका तरी थोरांनीच माफ केले
डोळे वटारलेले- ते धाकलेच होते

नावाजले जगाने सांगू तरी कुणाला
की नाव आपल्यांनी तर टाकलेच होते

झाली पहाट,झाला बभ्रा कसा कळेना
की कोंबडेहि सारे मी झाकलेच होते

मागावयास माफी ते पाय मी धरोनी
गेलो,नि हाय दैवा ते माखलेच होते

दु:खास मीच माझ्या बाहूंत शांत केले
शोधीत आसरा ते मजसारखेच होते

हे काय आज त्यांना आले हसू नव्याने
माझे फजीत होणे तर कालचेच होते

हात देणारेच त्याचे..

06 08 2008

( एकाच  ‘जमिनी’तून आलेल्या दोन्ही रचना एकत्र देत आहे)
संपला विश्राम कामा लागुया
शोधुनी थकवा नवीन पाहुया

दाटून ओथंबणे बरसणे पुरे
खूप झाला शोक थोडे हासुया

मृत्युची कौतुके कोणी करावी
संपले नाविन्य त्याचे सांगुया

याचकांच्या वाढत्या गर्दीमध्ये
कुणी दाता भेटतो का पाहुया

घट्ट मिटुनी ओठ जीणे नको
जून झाले मौन ताजे बोलुया

रात्र सरली तारका मंदावल्या
जाग ये गावास आता जाउया

विन्मुख तो कोणाहि ना धाडतो
हात देणारेच त्याचे मागुया ! *
(* ” देणार्‍याचे हातच घ्यावे…”  ह्या उत्तुंग ओळींवरुन साभार! )

******

साधतो का हा तराणा पाहुया
सूर लावून तो  पुराणा पाहुया

आजही ती येणार नाही म्हणे
आज कोणता बहाणा पाहुया

ध्येयवेडे दौडले निखार्‍यांवरी
पाय त्यांचे,त्या वहाणा पाहुया

प्रेम शोधत आजही तो हिंडतो
कोण आहे हा शहाणा पाहुया

सांगेल सारे एकदाचे आज ती
काय घाली ती उखाणा पाहुया !

कोण आहे

31 05 2008

ठरविले त्यांनीच होते मी कोण आहे
कोण मी हे सांगणारा,मी कोण आहे!

शपथा त्या स्मरुन आज वचने तुझी
खिन्न हासला आत तो कोण आहे

श्वास रोधुन बैसलो होतो किनार्‍यावरी
श्वास घेण्या की निघेल जो कोण आहे

तो जाणतो,मन राखण्या माझे परि
हिंडतो शोधीत माझ्यासवे कोण आहे

रंगला वादंग व्यर्थ कुरुक्षेत्री भासतो,
युधिष्ठिरही मीच आणि मी द्रोण आहे

पाहीन म्हणतो त्यास मीही एकदा
पाहसी माझ्यात जो,तो कोण आहे

संपले आयुष्य सारे शोधही थंडावले
आणि आले आज दारी हे कोण आहे !

राहून गेले

17 05 2008

बोलणे कित्येकदा होऊन गेले
सांगणे प्रत्येकदा राहून गेले

सत्य उठुन दिसलेच नाही
उठून बघणे राहून गेले

आसवे रुसवे गेले विरोनी
हासणे स्मरणात राहून गेले

गुंग बघण्यात सर्वांसवे मी
पाहणे बरेचसे राहून गेले

वेळ अपुल्यांना असतो कधी
अनोळखी चौकशी करुन गेले

कोण चुकले हिशेब राहुद्या
जाउद्या व्हायचे होऊन गेले

पोरका एकटा नव्हतो कधीही
विरह माझ्यासवे नांदून गेले

काय शोधण्या मी आलो इथे
विसरलो,शोधणे राहून गेले !

जागुनी जगलो

11 05 2008

तिमिरात उषेचे स्वप्न घेउनी जगलो
मी हार गळ्यातील हार मानूनी जगलो

संदर्भ रोजचे कालबाह्य होताना
मी इतिहासाला उरी घेउनी जगलो

तुडवून फुलांना खुशाल ते जाताना
मी कर्ज कळीचे शिरी घेउनी जगलो

मी त्याच ठिकाणी रोज ठेच खाउनही
त्या क्षितिजावरती नजर ठेउनी जगलो

जगण्याच्या धुंदीत तोल तुझा जाताना
मी मात्र नशेचे भान लेउनी जगलो

तू वार्‍यावरती शब्द उधळिले आणि
मी त्या शब्दांना नित्य जागुनी जगलो

आयुष्य आजचे समोरुनी येताना
मी हाय ! उद्यावर त्यास टाकुनी जगलो

ये असा

27 04 2008

बघ एकांत, बसू निवांत, जीवनाचा हट्ट आहे
भेटल्यावर काय बोलू, हे जरा अस्पष्ट आहे
पचवुनी आकांत माझे, शांत जग हे झोपलेले
जागवु त्याला कसे हे काय करणे इष्ट आहे ?
सुखमहाली दंगलो मी, दु:ख दारी तिष्ठले
स्वागता गेलो न म्हणुनि मजवरी ते रुष्ट आहे
कसे म्हणू तू एकदाही, भेटलीस मज नाही
आलीस,म्हटलेस ‘नाही’,त्यात मी संतुष्ट आहे !
पाहिले स्वप्नीच होते,वास्तवाचे स्वप्न मी
भानावर आलीस तू,रोजची मज गोष्ट आहे !
ये असा बाहूंत माझ्या, आसवांना वाट देऊ
स्वच्छ डोळ्यांनी उद्याला, पाहू कोणा कष्ट आहे…

सांगाल का ?

21 04 2008

( शेवटच्या दोन द्विपदींचा संदर्भ : http://www.manogat.com/node/13514#comment-115583)

गाईले अधुरेच गीत मी, तिला सांगाल का
राहिलो जगास भीत, एवढे कराल का

हा भरुन आसमंत, मंद वाहतोय गंध
असेल ती कुठे इथेच, ठाव तो दावाल का

रातराणिच्या फुलांस, बहर आज येत खास
गेली कोणत्या दिशेस ती, मला सांगाल का

जागता तिचेच भास, स्वप्नांतुन तोच ध्यास
भेटताच ती उद्यास, जाण तीस द्याल का

ह्या टिपूर चांदण्यात, जागलो पहात वाट
होतसे अता पहाट, तिज निरोप द्याल का

येइलच ती इतक्यात,ह्या दवभरल्या धुक्यात
दाबलेल्या हुंदक्यात बोलू काय सांगाल का

रात्रि माझियापरीच, घेऊनी कविता उरीच
न जागला तुम्ही कधीच, कि खरे सांगाल का

विसरलो विसरायचे

22 03 2008

…. विसरलो विसरायचे …
******************

ठरविले तेव्हाच होते मी तुला विसरायचे
आठवांत मग्न मी,  विसरलो विसरायचे

गंधलात, धुंदलात मयसभेत माझिया
आल्यावरि भानावर, अरे रे.. विसरायचे!

का म्हणुनी दुनियेचे दोष मला दाविसी
स्मरतो स्वतःचे;  दुसर्‍याचे ? विसरायचे !

लुकलुकती प्रखर नभी दीपक जरि तार्‍यांचे
ज्याविणा प्रकाश ना त्या तमा विसरायचे?

गुंतलात जरि जनहो कुंतलात माझिया
सोबत ही घटकाभर सारे मग विसरायचे..

पदोपदी पाऊल मी सांभाळुन टाकिले
दु:ख हे कि वय सरले,राहिले घसरायचे

लपवाया घाव खोल शपथ घालिसी मला
भिजले हे वस्त्र तुझे मी कसे विसरायचे !

——————————————————————————

… विसरलो पसरायचे !
******************
यत्न करुन नच जमले दु:ख हे विसरायचे
टाकुनिया जाल जळी, पसराया विसरायचे ?

खोकलात, शिंकलात भरसभेत माझिया
छापिल मज भाषण ते मी कसे विसरायचे ?

गळा-मिठीही मारिती, मैत्र सदा दाविती
भांडती नळावरि ते हे कसे विसरायचे !

लखलखती घटकाभर मम सदनी दीपक हे
भारनियमन जन्माचे, ते कसे विसरायचे!

गुरफटले का जन हे बंडलात माझिया
आमिष जरि व्याजाचे,मुद्दला विसरायचे?

ओली मम वस्त्रे  मी रोज पिळुन टाकितो
आशेवर, की येतील दिवस तू परतायचे !

लपवाया वय अपुले केश रंगविलेस तू
शुभ्र खुंट दाढीचे- असे कसे विसरायचे?

————————————————————-