Archive for the ‘मराठी कविता’ Category

नामकरण

04 07 2008

एकदा एका कविने ,प्रसवली दो कवने,
आणखी वर आवर्तने । झाली हो कविता ॥
गोंडस काव्य पाहोन, कविमन जाइ हरखोन,
आद्याक्षर पारखोन । बारसे करु म्हणे ॥

मेंदूस दिला ताण, बुद्धीस आणिला शीण,
योग्य ते नामाभिधान । तियेसाठी सुचेना ॥
साजेश्या नावावीण, कैसे व्हावे प्रकाशन,
काव्यनामप्रयोजन । तेथेच की ॥

ऐसे समयी कविमित्र ,संगणकप्रयोगी सुपात्र,
योगायोगे विचित्र । कविगृही पातला ॥
परवलीशब्द मंत्रोन, संगणकसंमुख बैसोन,
करी मूषक धरोन । टिकटिक तो करी ॥

*जाल धुंडिले शोधयंत्राने,कैक ती अभिधाने,
दावोन कविसी म्हणे । ‘ निवड एक ‘॥
सापडेना नाव अचूक ,कविमनी धाकधूक
अनामिता अपुली लेक । राहील की ॥

दोन प्रहर लोटता ,हार मानिती उभयतां
कविपत्नी तेथे तत्त्वता । उभी ठाकली ॥
वृथा होई कालहरण, लांबले ते नामकरण,
दोघेही  येता शरण । कविभार्या वदे ॥

‘फक्त इतुके करावे, काव्य समीक्षका दावावे
एक का- मग अनेक नावे । ठेवील तो’॥

कपाळा हात मारोन, कवि निघालासे घरोन
पुढील कल्पना करोन । मीही थांबतो ! ॥

( *पाठभेदः ‘आंतर्जाल सर्चिले गुगलाने’ )

Advertisements

प्रवास

15 06 2008

दीर्घ प्रवासी काही नवथर कुणि होते कसलेले
वृद्ध जोडपे शांत एक त्या खिडकीशी बसलेले
केस रुपेरी,प्रसन्न मुद्रा,बरेच सुरकुतलेले
कैक वादळे त्यांनि उन्हाळे असावे बघितलेले

पुढच्या थांब्यावरी घोळका तरुणाईचा शिरला,
अवखळ किल्बिल चित्कारांनी आसमंत भरला
सहलकरी ते प्रवास त्यांना नवलपरी हे सारे
सहप्रवासी त्रस्त बिचारे पेंगुळले होते सारे

त्याच प्रवासी मीही-ऐकुन,पाहुन चुकचुकलेला
विशी-सत्तरी मधला होतो, पन्नासा झुकलेला
सय गेल्याची,भय येत्याचे,वय ते अवघडलेले
काल-आजचे आणि उद्याचे प्रश्न मला पडलेले

‘काय म्हणावे ह्या पोरांना’ मी रागाने म्हटले
लख्ख हासुनी,मज कानी ते आजोबा पुटपुटले

‘जरा आठवू दिवस आपले,होते भरकटलेले,
ढगांत डोके,जमिनीवरुनी पायही ते सुटलेले
ह्या चक्राच्या परिघावरचे बिन्दू आपण सारे
आज जिथे मी,उद्यास तुम्ही,परवा ते येणारे..’

समजुन गेलो,भान असावे सदैव या सत्याचे
अनित्य सारे येथे केवळ परिवर्तन नित्याचे !

पहिले-वहिले

08 06 2008

थरथर हाती लिहिलेले
नवथर भावे भिजलेले
स्मृतिगंधाने दरवळले
पत्र तुझे पहिले-वहिले!

‘प्रिय’शब्दाने सजलेले
हॄदयातुन जे रुजलेले
अलगद पत्रात उतरले
लाजरे बोल ते पहिले

मुग्ध गूज ओठांवरले
नजरांनी होते कथिले
सांगण्या शब्दही स्फुरले
ते पत्र तुझे गे पहिले..

बहु दिवसांनी सापडले
पुस्तकी जुन्या दडलेले
आज पुन्हा आठवले
काळिज ते धडधडलेले !

जमाखर्च

27 05 2008

तसं आमचं फारसं जमत नाही
आमचं कशावरच एकमत नाही
तिच्या शिवाय मन रमत नाही,
मी नसता तिलाही करमत नाही !

आमचं शांततामय सहजीवन
टिकवायचा प्रयत्न करतो,
ती दूरवर दिसली तरी
मी चटकन उभा रहातो !

माझं तिच्याआधी येणं
तुम्हाला आवडेलसं नाही
तिचं माझ्यापूर्वी असणं
नेहेमीच घडेलसं नाही

मी नाहीच अन फक्त ती ?
एक दिवास्वप्न भोळं..
ती नसताना केवळ मी ?
आधी दिवाळी, मग दिवाळं !

रंगमंचावर मिरवायला मी
पडद्यामागून पुरवायला ती
घराघरात असतो आम्ही
माझं नाव खर्च,तिचं…प्राप्ति !

गीत उरावे

27 04 2008

सांगावे हे गुज वाटावे
अधिर ऐकण्या ते भेटावे
शब्द लाजरे हळु रेटावे
अंतर मौनातले फिटावे
सांगायास विलंब न व्हावा
ऐकल्यावरी धीर रहावा
मायेला आरसा मिळावा
छायेतच कवडसा मिळावा
मीलनक्षण असा खुलावा
एक कटाक्षी जीव भुलावा
गुलाब गालांवरी फुलावा
हर्षभराने देह झुलावा
मंद गंध शब्दांना यावा
लज्जेचा निर्बंध गळावा
स्पर्शांतुन नव अर्थ रुजावा
आवेग मनीचा व्यर्थ न जावा
शब्दांचे मग काम सरावे
काय सांगणे ते विसरावे
मिटोनिया सारेच दुरावे
मधुर एक ते गीत उरावे !

प्रिय कवितेस

12 04 2008

( ऋणनिर्देश : कवितेस उद्देशून लिहिलेल्या ह्या ओळी ‘नसतेस घरी तू जेव्हा’ ह्या अप्रतिम रचनेच्या लयीत आणि बाजाने बेतायचा प्रयत्न केला आहे. त्या सुंदर काव्यशिल्पाशी संबंधित सर्व गुणीजनांना नम्र अभिवादन करुन… )

मजसोबत तू असताना
संगे उठता-बसताना
संदर्भ रोजचा असतो,
पण अर्थ नवाच दिसतो

तू भुलवत मज गाताना
तव ताना ऐकवताना
मी कुणी वेगळा बनतो
निःशब्द तुला गुणगुणतो

कधि जवळुन तू जाताना
वार्‍यागत झुळझुळताना
काळजामध्ये हुळहुळतो
मज स्पर्श हवाच असतो

दुरुनी मज तू बघताना
नि:श्वास मंद निघताना
मी तुझी प्रतीक्षा करतो
माझ्याही नकळत झुरतो

मज जवळी  तू नसताना
तुज दुज्यासवे रमताना
पाहुनी जीव हुरहुरतो
शंकित मी उगाच  होतो

आठव मज तव येताना
अपुल्याशीच पुटपुटताना
वेडयांत काढती सारे
मज मीच शहाणा दिसतो !

देवीचा गोंधळ

11 04 2008

( ॠणनिर्देशः  अजय- अतुल ह्या अत्यंत गुणी जोडगोळीच्या  ‘गोंधळ’ ह्या लोकप्रिय रचनेवर

आधारित, मूळ कलाकृतीशी संबंधित सर्व प्रतिभावंतांना नम्र अभिवादन करुन ! )
उदे उदे उदे उदे….

माहुरगडच्या रेणुकाईला नमस्कार माझा
भक्तातोंडी  कवन वदविसी चमत्कार तुझा
आई माझ्यावरी, तान्ह्यावरी, कृपावस्त्र पांघरी
आज औक्षणाला ये,
गोंधळ मांडला रेणुके, गोंधळाला ये, उदे उदे उदे…
तुळजापुरवासिनी भवानी तूच जगन्माता
गहिवरला हा गळा माऊली गान तुझे गाता
आज दया करी, माझ्यावरी ,जागव ही वैखरी
तुझ्या कीर्तनाला ये,
गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये, उदे उदे उदे…
कोल्हापुरची अंबाबाई आदिशक्ती माता
संसारातुन पार करवसी धन्य तुझी सत्ता
आली आली स्वारी, भक्ताघरी, कृपा तुझी मजवरी
माझे अंतःकरणी ये,
गोंधळ मांडला तिथे गं, गोंधळाला ये, उदे उदे उदे…
सप्तशृंगी नाशिकातली देवता वणीची
दर्शनमात्रे तहान पुरवी साधका मनीची
नाव जिभेवरी, चढु पायरी, आलो तुझिया द्वारी
आज भंडार्‍याला ये,
गोंधळ मांडला माय गं, गोंधळाला ये, उदे उदे उदे…

गुढीपाडवा

06 04 2008

आधी वंदूया लंबोदरा, नमुया प्रभाती दिनकरा
सर्वधारीनाम संवत्सरा, शुभारंभ नववर्षजागरा !

जुन्यातले नवे ठेवुन,सर्वांगी नवपालवी लेऊन
नव्याची ओढ सनातन, पुरवो हे वर्ष नूतन !

साडेतीन मुहुर्तांपैकी एक, गुढीपाडवा सण सुरेख
या मंगलदिनी काही एक, शुभकार्य अवश्य करावे..

येत्या वर्षी नवीन घडूद्या , टाकाऊ ते सारे झडूद्या
मंगलवार्ता कानी पडूद्या , गुढी यशाची नवी चढूद्या.

नववर्षी इतिहास घडवा, कर्तॄत्त्वाचे इमले चढवा
माणसांतले मैत्र वाढवा- सुरुवात आजच…गुढीपाडवा !

नवशिका

01 04 2008

सर्वांनाच हे सत्य असतं माहित,शिकणं आयुष्यात पहिलं गृहित
अनुभवाच्या पुस्तकातून शिकत, लिहून घ्यायचं कोर्‍या वहीत
इथे टिकणं म्हणजे शिकणं आलं, नवशिक्याचं दुखणं आलं
सुरुवातीचं चुकणं आलं , अपमान गिळून वाकणं आलं
नवागताचं थरथरणं आलं,जाणत्याची बोलणी खाणं आलं
आपल्याच नजरेतून उतरणं आलं,गुरुचं मन राखणं आलं..

आपण सगळेच ह्यातून जातो,कसोटीचा तो काळ विसरतो,
हळूहळू नवीन नवख्याला, आपल्याही नकळत ऐकवू लागतो-
“आम्हाला हवाय माणूस अनुभवी,नवशिक्याची कटकट कुणी घ्यावी?
अहो,उमेदवारी अवश्य करावी पण..गैरसोय कुणी सहन करावी ? ”
आजवर असा एकच झाला,आईच्या पोटात शिकून आला
चक्रव्यूहात शिरुन उरलेला,धडा शिकून निघून जायला…
बाकी तुम्हां-आम्हांला, इथे येऊनच शिकायचं-शिकवायचं
आपलं शिकणंही सहन केलं होतं कुणीतरी ,कधीतरी–

…..हे मात्र ध्यानात ठेवायचं !

सौंदर्य

10 03 2008
मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात तू रोजच दिसतोस
मी भेटले की, संभ्रमात, अवघडलेलं हसतोस.

माझी हुशारी, बोलणं-वागणं   तुला भावलेलं दिसतंय,
त्याचं कौतुक तुझ्या डोळ्यांत तुझ्या नकळत हसतंय !

पण.....मी दिसायला सामान्य आणि मलाही आहे मान्य
सर्वमान्य हे सत्य, की सौंदर्य तेच, जे डोळ्यांना दिसतं !

माझ्यातली ती अदृष्य सुंदरी जी तुला खुणावतेय ना,
तिच्या दृष्य रुपातली उणीव तुला अस्वस्थ करतेय, ना ?

असल्या नकारांची आताशा सवय होऊ लागलीय मला,
खरंच, पण असं का व्हावं कधीच कळणार नाही मला !

आतून आपल्या सौंदर्याला नित्य उधाण येत रहावं,
अन किनार्‍यावरच्या जगाच्या..... ते गावीही नसावं ?

कधीतरी वाटून जातं - भरतीच्या समुद्रासारखं, वहावं
ते ओसंडून बाहेर , अन अलगद सर्वांगावर पसरावं...

फार नाही, निदान इतपत तरी, की कधीतरी,
...... तुझ्यासुद्धा डोळ्यांना ते दिसावं !