तो तसा दिसायला सामान्यच,
दोघांच्या गर्दीतही हरवून जाणारा
चालणं-बोलणं अडखळत त्याचं,
एकूण अस्तित्त्वच अवघडलेलं.
दिवसात एकदा हसला तरी पुरे,
आयुष्यात रंग उरलेत फक्त करडे-भुरे…
…..
पण तरीही तो आहे जरा निराळाच,
अस्तित्त्वाच्या मंथनात, कोलाहलाच्या हलाहलासोबतच
त्याला गवसलाय एक अमृतकुंभ… प्रतिभेचा !
…..
मधूनच कुठुनशी एक हलकी साद येते
फक्त त्यालाच ऐकू येणारी-
मग त्याच्या वावरण्यात येते,
एक निर्भय सफाई, लगबग
न शोभणारा अधीरपणा….आणि
तो उघडतो मनातलं ते दालन…
आतलं लखलखतं मोरपीस त्याला खुणावतं
ते मस्तकी खोवुन, तो बनतो कुणीतरी वेगळाच !
हाहा म्हणता तो मग रचतो शब्दांचे मनोरे,
लीलया उभारतो भावनांची भन्नाट वादळं,
प्रतिभेच्या कुंचल्यानं चितारतो
अभिव्यक्तिचं वेलबुट्टीदार इंद्रधनुष्य…
स्वतःशीच गुणगुणत,उन्मत्त डोळ्यांनी
तो नजर दौडवतो आपल्या प्रतिसृष्टीवर, आणि-
सृजनाच्या शतधारांत चिंब होऊन त्याच्या
मनातला मोर थुईथुई भिरभिरत रहातो..
…..
यथावकाश सारं पहिल्यासारखं होतं,
बरसून गेलेल्या पावसाचा मागमूसही
त्याच्या चेहेर्यावरुन पुसून जातो
पण मनातलं ते मोरपीस मात्र
खट्याळपणे हसत रहातं,
त्यालाच ऐकू जाईल, अश्या बेतानं !
24 08 2008 येथे 4:58 सकाळी |
सतिशजी,
सर्व कविता वाचल्यावर एकच उद्गार मनातून येतो
“अतिसुंदर”
प्रतिभेतूनच निर्मिती होते.आणि निर्मिती हा निसर्गाचाच नियम, आणि जेव्हा,
“अभिव्यक्तिचं वेलबुट्टीदार इंद्रधनुष्य…
स्वतःशीच गुणगुणत,उन्मत्त डोळ्यांनी
तो नजर दौडवतो आपल्या प्रतिसृष्टीवर,”
आणि ही प्रतिसृष्टी म्हणजेच निसर्गाने निर्माण केलेला तो विलोभनीय मयूर.त्या मयूराच्या निर्मिती नंतर ते रंगीबेरंगी मोरपीस निसर्गालाच हसून हसून सांगतंय,
“तुलाच गवसलेल्या प्रतिभेच्या अमृतकुंभातून माझी निर्मिती झाली रे निसर्गा!”
वाः!वाः! सतिशजी,क्या बात है!
आपली कविता वाचून मला जे काय वाटलं ते मी लिहिलं.
एकच मी म्हणेन,
“ढगाला आली कळं
शब्द थेंब थेंब गळं”
25 08 2008 येथे 11:19 pm |
सामंत साहेब,
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद, तुमच्या ह्या सुंदर प्रतिसादाच्या बाजूला कविता ज़रा फिकीच वाटतेय !
02 09 2008 येथे 12:26 pm |
excellent