तो घुसला होता थेट घरात, दिलखुलास हसत
येउन गेलं होतं मनात,हा इथला नाही दिसत !
मनमुराद बोलणं अन आरश्यासारखं जगणं
कसं खपावं इथल्यांना, त्याचं वेड्यासारखं वागणं !
न संकोच ना भीती, ना परिणामाची क्षिती
म्हटलं शिकेल अनुभवांती, इथल्या चाली-रिती.
आली होती त्याला बघून, विसरलेली आठवण
नव्हतो का एकेकाळी, अगदी असेच आपण….
………………
बर्याच दिवसांनी भेटला, खूपच आता बदललाय
झुकलेला, विझलेला, आम्हां सगळ्यांसारखा झालाय
थोडं-फार वाईटही वाटलं, म्हटलं ह्याचंही असं व्हावं ?
नक्की समजेनासं झालं; आपल्याला हेच होतं ना हवं ?
…………………
त्याचं वेगळेपणाचं वेड आज पुन्हा आठवलंय
त्या वेडाचं वेगळेपण, आत कुठेतरी साठवलंय
त्याला एकदा भेटून, हे सांगायचं राहून गेलंय
दरम्यान पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय….
………………….
आज ऐकलं तो म्हणे शहर सोडून निघतोय
त्याच्या जागी इथे, बघू नवीन कोण येतोय !
05 02 2008 येथे 12:09 सकाळी |
fantastic,shaharat yeun sarv jana asech hotat.