सरकार आपलं असं असावं – जागरूक, कर्तव्यपरायण असावं
माझ्या वाट्याच्या जबाबदारयांशी मात्र, त्याला काही कर्तव्य नसावं
सरकार आपलं – जनहितरक्षक, लोकप्रतिपालक असावं
माझ्या अवसानघातकीपणाकडे मात्र, त्याचं पुरेसं लक्ष नसावं
सरकार आपलं – कनवाळू, मानवतावादी असावं
माझ्या अमानुष वर्तनाकडे मात्र, त्याचं सोईस्कर दुर्लक्ष असावं
सरकार आपलं – सर्वधर्मसमावेशक, सहिष्णु असावं
माझ्या उन्मत्त उतावीळपणाचंही, त्याला तितकंच कौतुक असावं
सरकार आपलं – नि:पक्षपाती, नीतिमान असावं
माझ्या नैतिक दिवाळखोरीला मात्र, त्याचं आव्हान नसावं
सरकार आपलं – प्रजासत्ताक, लोकतंत्र असावं
माझ्या स्वायत्त मनमानीचंही, इथे समर्थन असावं
सरकार आपलं – उदारमतवादी, विश्वबंधुत्त्वाचं असावं
माझ्या कूपमंडूक वृत्तीलाही, इथे मानाचं स्थान असावं
सरकार आपलं – वैभवशाली, सुखसंपन्न असावं
माझ्या कद्रूपणाचं मात्र, त्याला कधी वावडं नसावं
सरकार आपलं – संस्कृती, इतिहास जपणारं असावं
माझ्या बिनबुडाच्या परंपरावादाचं, त्याला तितकंच अप्रूप असावं.
सरकार आपलं कसं पुरोगामी, गतिमान असावं,
निष्क्रिय ओझं बनून रहायचं मला, व्यक्तिगत स्वातंत्र्य असावं !
प्रतिक्रिया व्यक्त करा