अशी आपली बायको असावी – हजार जणींत उठून दिसावी
थोडीसुद्धा तिला मात्र, त्याची मिजास नसावी
अशी आपली बायको – भक्कम पगाराची,कायम नोकरीची असावी
मी म्हणेन तेव्हा मात्र, ती मला घरीच दिसावी
अशी आपली बायको – चतुर, शहाणी,अभिमानी असावी
नम्रपणे माझ्यापुढे मात्र, मान तिची खाली असावी
अशी आपली बायको – सभेत धीट, कामाला वाघ असावी
माझ्यासमोर घरीदारी मात्र, ती गरीब गाय असावी
अशी आपली बायको – बोले तैसी चालणारी असावी
माझ्या जुन्या वचनांची मात्र, तिला कधी आठवण नसावी
अशी आपली बायको – प्रसन्न, सदा हसतमुख असावी
माझ्या आक्रस्ताळीपणावर मात्र, तिच्या भाळी आठी नसावी
अशी आपली बायको – शांत गंभीर, पोक्त असावी
माझ्या बालिशपणाविषयी मात्र, तिची काही प्रतिक्रिया नसावी
अशी आपली बायको – व्यवहारी, काटकसरी असावी
माझ्या उधळपट्टीवर मात्र, तिची कधी टीका नसावी
अशी आपली बायको – एक आदर्श गृहिणी असावी
माझ्या ढिसाळपणाबद्दल मात्र, तिची काही तक्रार नसावी
अशी आपली बायको – सुसंस्कृत माता असावी
माझ्या बेबंद वागण्याची मात्र, मुलाबाळांवर सावली नसावी
अशी आपली बायको असावी – माझ्यापलिकडे तिची दृष्टी नसावी
मी खिडकीबाहेर बघण्याला मात्र, तिची कधी हरकत नसावी !
03 01 2008 येथे 9:30 pm |
now this is one way traffic,ap ek kavi ho,sirf purush ke bare mein likha,nari ka bhi mann hota hai ,uska jeevan sangi use samjhe?this is tragedy of indian males ,kya kare.
03 01 2008 येथे 11:19 pm |
त्याचं असं झालं :
आत्मपरीक्षणाच्या एका दुर्मिळ क्षणी अकस्मात सत्यदर्शन झालं, आणि त्या लख्ख उजेडात स्वतःला उद्देशून ही वक्रोक्ती जन्माला आली. यथावकाश भानावर आल्यावर लक्षात आलं की आपल्या ‘खरोखरीच्या’ अपेक्षा फारश्या भूषणास्पद नसल्या तरी अगदीच वेगळ्या नाहीएत ….म्हटलं बघू इतरांना काय वाटतंय !
बाकी तुमच्या कौतुकाच्या प्रतिसादांबद्दल मनः पूर्वक आभार !