गैरसमज–१
*********
विस्मृती म्हणे एक वरदान आहे; मग गैरसमजाचं काय ?
गैरसमजा बद्दल आपल्या मनात असतात बरेच गैरसमज…..
खरं तर ते आहे मनुष्याच्या आयुष्यातलं एक अदृश्य वरदान,
जे सुसह्य करतं आपल्या वाट्याला आलेलं दान.
आपले समज सगळेच अचूक आहेत,
या गैरसमजाखाली रहाणं काही गैर नाही !
कल्पना करा, आपल्या सगळ्यांच्या मनातले गैरसमज
एका भल्या पहाटे नाहीसे झाले तर ?
आपल्या स्वतःविषयी, इतरांबद्दल असलेले
गैरसमज उराशी कवटाळून आपण
करत असतो वास्तवाशी सामना.
रात्री झोपताना, मी उद्या उठणारच ह्या खात्रीने आपण,
भविष्यातले मनोरे उभारतो;
कोणे एके दिवशी तो समज, गैरसमज ठरतो.
आणि मग सगळ्या समज-गैरसमजांची,
आंधळी कोशिंबीर संपते कायमची…….
पण तोपर्यंत मात्र—
मी कोणीतरी आहे , माझं कोणीतरी आहे,
ह्या गैरसमजामुळेच तर सगळं चाललं आहे !
घराबाहेर पडताना, बाहेरच्या जगाला
आणि कुठुनतरी परतताना आपल्या घरच्यांना
आपली गरज असल्याची नि:संशय खात्रीच तर
आपल्याला प्रवृत्त करत असते या प्रवासाला….
आपल्याशिवाय हे सगळं कोलमडून पडेल,
जे काही आहे ते आपल्यामुळेच,
असल्या गोड गैरसमजांची शाल पांघरून
दिवास्वप्नांच्या झगझगीत उजेडात
भ्रमाच्या भोपळ्यावर स्वार होऊन
आपण टुणुक-टुणुक प्रवासात गर्क असतो…..
वास्तवाचा सूर्य मात्र तेव्हा आपल्याला घेऊन जात रहातो,
क्षितीजाकडे , भ्रमनिरासाच्या .
——————————————————————————————
गैरसमज -२
**********
पृथ्वीतलावर मनुष्यजीवन
येथे विस्मृती मोठे वरदान
त्याहून उपयुक्त आणि महान
पण बदनाम । नामे गैरसमज ॥
सकळांसाठी जो सुलभ, सहज
अखिल मनोव्यापारांचा पूर्वज,
एक स्वर्गीय ऐवज । गैरसमज ॥
त्याचे प्रति आपुले अंतरी
असती बहु पूर्वग्रह परि
तोचि सुसह्य करी । मानवी जीवन ॥
स्वतःविषयी अन दुसरयाचे ठायी
गैरसमज कवटाळुनि हृदयी
वास्तवाशी करी हातघाई । मनुष्यप्राणी ॥
माझ्याकरिता हे जग हाले
माझ्याचमुळे हे सर्व चाले,
या गैरसमजामुळेच चाले । जीवनयात्रा ॥
मजवाचुनी कायसे घडेल
जग मी नसता कोलमडेल
माझ्यामागे माझ्यासाठी । ते रडेल, गैरसमज ॥
निघताना घराबाहेरी
परतताना आणिक घरी
इथे अपुलेच असणे जरुरी । हा गैरसमज ॥
मी कुणीतरी आहे,
माझे कुणीतरी आहे
वृथा प्राणि वाहे । हा गैरसमज ॥
आज रात्री जो निजेल
तो हमखासच उद्या उठेल
एके दिवशी तरी चुकेल । हा समज ॥
तोपर्यंत मानव अंतरी,
गैरसमज राज्य करी
वास्तवदर्शन जोवरी । न करी, भ्रमनिरास ॥
प्रतिक्रिया व्यक्त करा