एकदा कवी, ‘ कविता लिहायची’ ठरवून,
पुढ्यात कागद ओढून,
त्यावर काटकोनात ले़खणी ठेवून
जय्यत तयारी करून,
बसला बैठक मारुन , पण…
काही केल्या स्फुर्ती येईना,
पुढचा शब्द त्याला सुचेना.
कवी हट्टाला पेटला,
‘ आज करायचीच ‘ पुटपुटला, आणि
झाली सुरुवात खोगीरभरतीला.
इकडून तिकडून ऐकले- वाचलेले
शब्द कच्चे- अर्धवट भाजलेले
कल्पनेतच ऊबवलेले, मात्र
वास्तवाची धग कधीच न लागलेले….
तीव्र इछ्छेच्या कढईत, बळेच
त्या शब्दा-वाक्यांना लोटून,
अहंकाराच्या प्रखर आचेवर
कवितेचे आधण ठेवून,
हाती बेताच्या अनुभवाचा झारया घेऊन
यमकांची बुन्दी पाडायला,
कवी लागला काव्य ढवळायला—
यथावकाश मनातून लेखणीत,
अन तिथून कागदावर, भरभर
ऊतरले ते शब्द अनेक
एकच गिल्ला करू लागले, म्हणाले,
” तुम्हीच जमवलेल्या आम्हा बाजारबुणग्यांची
कशी वाटतेय कवायत ? “
प्रतिक्रिया व्यक्त करा